पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

संभाजीमहाराज बऱ्याच निर्वेधपणानें चालवू देत होते. पण पुढें तीही गोष्ट दिवसेंदिवस दुरापास्त होत चालली. कारण कीं, सन १७४० नंतर संभाजीमहाराज राज्यकारभारांत उदासीन वृत्तीनें वागूं लागले व त्यांची थोरली स्त्री जिजाबाई यांच्या तंत्रानेंच राज्यकारभार चालूं लागला. जिजाबाईंची कारकीर्द अथपासून इतिपर्यंत सर्व अवस्थितपणाची होती. प्रतिनिधि, अमात्य, सेनापति, सेनाखासखेल व इतर अधिकारी, इनामदार, दरकदार वगैरे यांतून कोणाशीं जिजाबाईंचे कधीं पटले नाही. त्या नाना प्रकारच्या सबबी लावून त्यांवर जुलूम करण्याचा यत्न करीत व त्यामुळें करवीर राजमंडळांत एक सारखा घोंटाळा व दंगेधोपे चालू असत.
 ताराबाई व संभाजीमहाराज यानीं अष्टप्रधानांची स्थापना केली त्या वेळीं त्यांची महत्वाकांक्षा फार मोठी होती. सर्व राज्य आपलें आहे, शककर्ते महाराज यानीं घालून दिलेल्या निर्बंधाप्रमाणें आपण चालत असून त्यांच्या कारकीर्दीप्रमाणेंच आपली कारकीर्दही यशस्वी करण्याचा आपलां निश्चय आहे, असें त्यांस म्हणजे त्यांच्यातर्फेनें रामचंद्रपंतांस प्रसिद्ध करावयाचें होतें; निदान शाहूपेक्षां आपण कोणत्याही बाजूनें कमी नाहीं हें तरी दाखवावयाचें होतें. परंतु पुढें कृष्णा-वारणेचा तह होऊन करवीर राज्याचा काय तो सोक्षमोक्ष कळून चुकला; तेव्हां करवीरचे छत्रपति व त्यांचे अष्ट प्रधान यांच्या आकांक्षा कार्याचें क्षेत्र अर्थातच मर्यादित झालें. नंतर राज्यकारभारांत जिजाबाईंचा पगडा बसला तेव्हां त्यांच्या अमर्याद प्रभुत्वास शककर्त्यांच्या कानूजाबत्याप्रमाणें अधिकार चालविणारे प्रधान प्रतिबंधक भासूं लागले! एवढेंसे राज्य, त्याला हे लाखों रुपयांचे सरंजाम खाणारे प्रधान कशाला पाहिजेत? एखादा हुशार कारभारी व फौजेचें काम पहाणारा शूर सरदार असला म्हणजे निर्वाह होईल.