Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५१)
व्यंकटराव नारायण.

लोकांनीं फोंडयावर हल्ला केला होता खरा, पण किल्ल्यांत व्यंकटरावांचे सरदार होते त्यांनी त्यांस हुसकून लाविलें होतें.
 गोंव्यावरच्या दोन्ही स्वाऱ्यांत व्यंकटरावांनीं जितका मुलूख जिंकिला होता तितका सर्व शाहूमहाराजांनी त्यांजकडे जहागीर म्हणून वहिवाटीस ठेविला. त्या मुलखाच्या आसपास कोल्हापूरकरांचे कांहीं टापू असल्यामुळे त्यांशीं नेहमीं तंटें होतील या भयाने ते टापूहीं व्यंकटरावांनी संभाजीमहाराजांपासून कमाविशीनें घेतले. याप्रमाणें तों नवीन जिंकिलेला मुलूख निर्वेध केल्यावर तेथील बंदोबस्ताकरितां त्यांनीं गोविंदराम ठाकूर यास सातशें स्वारांसह तिकडे नेहमीं ठेविलें होतें.गोंव्याच्या दुसऱ्या स्वारीहून परत आल्यावर स. १७३९ करवीरवासी संभाजीमहाराज यांनीं व्यंकटरावांस सुळकूड, टाकळी व दोन्ही शिर्दवाडे मिळून चार गांव इनाम दिले.
 महाराजांच्या सनदा एखाद्या वतनाबद्दल मिळाल्या तरी त्या वतनाचें उत्पन्न वतनदारास आपल्या मनगटाच्या जोरावरच मिळवून खावें लागत असे. मिरज प्रांतीं मोंगलांचा अंमल होता तेथपर्यंत म्हणजे सन १७४० पर्यंत तिकडचा देशमुखीचा अंमल व्यंकटरावांस कधींच सुरळीतपणें मिळाला नाहीं. त्यांचे दिवाण त्र्यंबक हरि यांनी गांवांवर स्वाऱ्या करून दर वर्षी गांवकरांस ठोंकून जबरीनें वसूल घ्यावा हाच परिपाठ पडला होता ! मोंगलाई मुलखांत महाराजांची देणगी जरी असली तरी तिजवर मोंगल अधिकारी मोगलबाब म्हणून एक कर घेत असत. परंतु तो कर घेणें हा निवळ जुलूम आहे असें समजून व्यंकटरावांनी मिरजेच्या मोंगल सुभेदारास तो कधींच दिला नाहीं. त्यामुळे त्याच्या त्यांच्या नेहमीं लढाया होत असत.
 पन्हाळा प्रांतीं शाहूमहाराजानीं व्यंकटरावांस देशमुखीं दिली होती. तिचा अंमल कांहीं बारीकसारीक अपवाद खेरीज करून