पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

वधूपक्षाकडच्या बायकानीं यावर साफ उत्तर दिलें कीं, विहिणींनीं दुसरे कोणतेंही मागणें करावें. त्या मागतील ती वस्तु देऊन आम्ही त्यांची हौस पुरवूं, पण जन्मांत आम्ही कधीं बुरखा घेऊन हिंडलों नाहीं तें याच वेळीं करून आम्ही आपला उपहास करून घेणार नाहीं ! त्यामुळें दोहीं पक्षीं तट पडून लग्न खोळंबण्याचा रंग दिसूं लागला. तेव्हां बाळाजीपंत नानानीं आपल्या बायकांची समजूत घातली कीं, हें राज्य व राजधानी मराठ्यांची, आणि व्याहीसुद्धा मराठेच आहेत! आपले व्याही नारोपंत हे आपणास संताजी घोरपडयांचे पुत्र म्हणवितात व पुत्राच्या नात्यानेंच त्यांच्या दौलतीचा हिस्सा खात आहेत. आम्ही हें सर्व जाणून सवरून त्यांच्या घरी मुलगी देऊं केली आणि आतां आयत्या वेळीं कुरकूर करून कसें चालेल! आपली मुलगी या बायांच्या हाताखलीं नांदावयाची, सबब यांस नाराज करणें योग्य नाहीं. त्या म्हणतात त्याप्रमाणेंच तुम्ही वागून त्यांची मर्जी सुप्रसन्न केली पाहिजे. याप्रमाणें सांगतांच वधूपक्षाकडच्या बायकानीं तोंडावर बुरखे घेतले आणि सर्व लग्नसमारंभ बिनतक्रार पार पडला !
 करवीर राजमंडळाचा पक्ष अधिक प्रबल करावा म्हणून कापशीकर व त्यांचे कारभारी नारो महादेव यांस रामचंद्रपंतानीं पूर्णपणें अनुकूल करून घेतलेलें होतें. शिवाय आंग्रे, सावंत, चव्हाण, थोरात व दुसरे अनेक सरदार त्यांच्या बाजूस होते. आपल्या पक्षास याहीपेक्षां अधिक सामर्थ्य आणावें म्हणून रामचंद्रपंतानी 'हिंदुराव' यांस वळविण्याचा प्रयत्न केला पण तो सफळ झाला नाहीं. त्या घराण्याचे स्थापक बहिरजी घोरपडे गजेंद्रगडकर नुकतेच मरण पावले होते. त्यांचे पुत्र शिदोजीराव यांस रामचंद्रपंतानीं करवीरकर छत्रपतींकडून सेनापतीचें पद देवविलें होते.ते फौजबंद व शूर सरदार होते. परंतु त्यांचें मन नेहमीं कर्नाटकच्या