पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २९ )
नारो महादेव.

स्वाऱ्यांत गुंतलें असल्यामुळें इकडे येऊन करवीरच्या मसलतींत पुढाकार घेण्याचें त्यांच्यानें होईनासें झालें. मग त्यांजकडून सेनापतीचें पद काढून रामचंद्रपंतानीं इ. स. १७१५ मध्यें संताजीराव घोरपडे यांचे पुत्र पिराजी घोरपडे कापशीकर यांस छत्रपतींकडून तें पद देवविलें. हे पद त्या दिवसापासून आजपर्यंत कापशीकरांच्या घराण्याकडे अव्याहत चालू आहे. त्या वेळीं पिराजीराव वयानें लहान असल्यामुळें अर्थात् सेनापतीनिसबतीचीं सर्व कामें नारो महादेवच पहात असत. याप्रमाणें त्या वेळीं करवीर राजमंडाळाच्या सचिवाचे व सेनापतीचे अधिकार कांही वर्षेपर्यंत त्यांच्या हातीं आले होते! कापशी घराण्याच्या किताबांपैकीं 'ममलकत मदार ' व मानमरातबांपैकीं जरीपटका व नौबत ही कापशीकरांचे अनुयायी व संताजीराव सेनापतीनीं मानलेले पुत्र या नात्याने बाळगण्याविषयीं करवीर छत्रपतींकडून नारो महादेव यांस याच काळांत परवानगी मिळालेली असावी. इचलकरंजीकरांच्या घराण्यात हा किताब व बहुमान अद्यापपर्यंत चालू आहे.
 नारो महादेव यांच्या हातून करवीर राज्याच्या कारभारासंबंधें पुष्कळ उलाढाली होत असत, व सेनापतींची व त्यांची स्वतःची फौज त्यांजवळ नेहमीं तयार असल्यामुळें संकटाच्या वेळीं शेजारचे संस्थानिक व जमीदार त्यांची मदत मागत असत. हुकेरी परगण्याचा सरनाईक शिदाप्पा म्हणून होता त्याच्या कांहीं कामकाजांत उपयोगीं पडल्यामुळें त्यानें नारोपंतांस शिपूर हा गांव इनाम दिला. या शिदाप्पाचें आडनांव निंबाळकर असें होतें. तो त्यावेळीं लिंगाईत धर्मानें चालत होता, परंतु पुढें त्यानें तो धर्म सोडला. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकीर्दीत प्रसिद्धीस आलेला शिदोजीराव नाईक निंबाळकर देसाई निपाणीकर हा सदरहू शिदाप्पाचा नातू होय.