पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(२७)
नारो महादेव.

+ बाळाजीपंत व नारोपंत हे सारख्याच तोलाचे व्याही होते. एक जाधवराव सेनापतीचे तर दुसरे घोरपडे सेनापतीचे कारभारी होते. एकाच्या पराक्रमावर शाहू छत्रपतींची सर्व भिस्त होती तर दुसऱ्याच्या पराक्रमावर शंभु छत्रपतींचें राज्य चाललें होतें. एक शाहू छत्रपतींचे पंत प्रधान झाले तर दुसरे शंभु छत्रपतींचे पंत सचिव झाले होते. पुढे बाळाजीपतांचे पुत्र व नातू पराक्रमी निघाले त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत आपल्या प्रतापाचा दरारा पसरून दिगंत कीर्ति केली. पेशव्यांच्या घराण्याशीं नारोपंतानीं शरीरसंबंध केल्यामुळें त्यानीं स्थापिलेलें इचलकरंजी संस्थान अनेक संकटांतून बचावलें व त्याचा उत्कर्षही बराच झाला.
 व्यंकटराव व अनूबाई यांच्या लग्नासंबंधें एक गमतीची आख्यायिका प्रसिद्ध आहे. लग्नाकरितां कापशीहून साताऱ्यास वऱ्हाड आलें त्यांत सेनापतींच्या घरच्या बायका प्रमुख होत्या. त्या व त्यांच्या मानकरणी साऱ्या बुरखा घेणाऱ्या होत्या हें सांगणें नकोच. या बायांनी हेका धरिला कीं, वधूपक्षाकडच्या बायकानीं बुरखा घेतल्याशिवाय आमच्या मांडवांत पाऊलसुद्धां टाकतां कामां नये !


+डफ् साहेब आपल्या इतिहासाच्या पृ० २०९ वर अनूबाईंच्या नवऱ्याचे नांव, " नारायणराव इचलकरंजीकर " असे लिहितात ! पृ.२४१ वर त्यानीं पेशव्यांचे मेहुणे व्यंकटराव नारायण असें नांव दिलें तें बरोबर आहे हें खरें, पण पूर्वोत्तरस्थलनिर्दिष्ट नामांतला विसंगतपणा त्यांच्या लक्षांत कसा आला नाहीं ? नारायणराव हें अनूबाईंच्या मुलाचें नांव आहे! तसेंच या साहेबानीं पृ० १८९ वर परशुराम त्र्यंबक प्रतिनिधीच्या थोरल्या मुलाचें नांव ' कृष्णाजी भास्कर ' म्हणून दिले आहे तें ‘ कृष्णाजी परशुराम ’ पाहिजे हें देखील साहेबमजकुरांच्या ध्यानांत आलें नाहीं ! मागें ( पृ० ७७ ) अफजूलखानप्रकरणीं एक नांव “ कृष्णजी भास्कर' असें आलें होतें तेंच त्यानीं येथेंही दपटून दिलें आहे ! मराठ्यांच्या इतिहासावर प्रमाणभूत म्हणून मानलेल्या ग्रंथांत नामनिर्देशाविषयीं इतकी हेळसांड असावी ही आश्चर्यांची गोष्ट आहे!