पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २० )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

बावा मोठे तपस्वी व देवतेच्या प्रसादास पात्र झालेले अशी सर्वत्र ख्याति पसरली होती. त्या हरभटजीनीं लक्ष्मीबाईस बोध केला कीं, तूं गिरीच्या व्यंकटेशाची उपासना कर म्हणजे तुला पुत्र होईल. तें बोलणे मान्य करून तिनें गिरीस जाऊन तेथें निष्ठेने देवसेवा केली व ती सफळ झाली. सन १७०१|२ च्या सुमारें नारोपंतांस पुत्र झाला व तो व्यंकटेशाच्या प्रसादानें प्राप्त झाला म्हणून त्यानीं त्याचें नांव व्यंकटराव ठेविलें. त्यांचे कुलदैवत शांतादुर्गा हें होतें, परंतु त्यांची भक्ति गिरीच्या व्यंकटेशावर विशेष बसल्यामुळें त्यांनीं तेंच कुलदैवत मानिलें. व्यंकटेशाच्या कृपेनें पुत्र झाला हें एक त्या देवावर भक्ति बसण्यास विशेषच कारण झालें. इकडच्यापेक्षां कर्नाटक प्रांती व्यंकटेशाचें माहात्म्य फार आहे व त्या देवाचे भक्त त्या देशीं कोटयावधि आहेत. जिंजीच्या स्वारींत नारोपंतांस अनेक साहसें व पराक्रम करावे लागले. अशा वेळीं तद्देशीय संप्रदायाप्रमाणें आपला बचाव व्हावा व कल्याण व्हावें म्हणून या देवाजवळ त्यानीं अनेक वेळां मागणें केलें असावें व त्याप्रमाणें घडून आल्यामुळें त्या देवावर त्यांची भक्ति बसली असावी. त्यांचे धनी कापशीकर यांच्या घराण्याचीं श्रीरामचंद्र, सुब्रह्मण्येश्वर व व्यंकटेश अशीं तीन कुलदैवतें आहेत.
 संताजीरावांस दोन पुत्र होते. त्यांत थोरला राणोजी हा लढाईंत पडल्याचें पूर्वी लिहिलेच आहे. संताजीरावानीं नारोपंतांसही पुत्र म्हणून मानिलें होतें व छत्रपतींकडून मिळालेल्या मिरज प्रांताच्या देशमुखी-सरदेशमुखीची वहिवाट त्यांस दिली होती. शिवाय इचलकरंजी व आजरें हे दोन गांव त्यांस मोकासा होते तेही त्यानीं नारोपंतांस दिले होते. आरग व मनेराजुरी हेही गांव त्यानीं त्यांस दिल्याचा उल्लेख आढळतो. नारोपंतांचा जन्म कोंकणात ज्या गांवीं झाला तो म्हापण गांव वाडीकर सावंत यांच्या ताब्यांत होता. तेथलें