पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/२९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१९)
नारो महादेव.

त्यावरून त्यांस गजेंद्रगडकर हें नांव पडलें. संताजीरावांची मुलेंमाणसें त्यांजजवळ होतीं, परंतु नारोपंतानीं त्यांशीं तंटा करून ती सर्व मंडळी आपले ताब्यांत घेऊन ते कापशीस येऊन राहिले. ते असें जर न करिते तर छत्रपतीनीं कापशीचा सरंजाम घोरपड्यांकडे होता तो काढून घेतला असता. इतउत्तर पिराजीराव व त्यांचे वंशज हे मात्र कापशीकर या नांवानेंच प्रसिद्धि पावले व त्यानीं छत्रपतींचा आश्रय कधीं सोडिला नाहीं.
 नारोपंतांची आई गंगाबाई कधीं मरण पावली हें कळत नाही. नारोपंतांच्या स्त्रीचे नांव लक्ष्मीबाई असें होतें, हें पूर्वीच सांगितलें आहे. त्या बाईस संतान झाले नाही म्हणून ती फार कष्टी असे. संतति होण्याची आशा खुंटत चालली म्हणून नारोपंतानीं स्वगोत्रापैकीं एक मुलगा जवळ बाळगिला होता त्याचें नांव नरसिंगराव. नारोपंतांचे मूळचे उपाध्ये केळकर म्हणून होते त्यांच्याच घराण्यांतला हा मुलगा होता असें सांगतात. हा मुलगा नारोपंतानी दत्तक घेतला होता असें कोठें कोठें लिहिलें आहे व कोठें तो त्यांचा 'पोसणा' म्हणजे बाळगलेला मुलगा होता असेंही लिहिलें आहे. तो मुलगा बराच मोठा होईपर्यंत नारोपंतांच्या कुटुंबांत रहात होता व ते वारल्यावर घरचा कारभार व त्यासंबंधे स्वाऱ्या शिकाऱ्याही करीत असे. कागदोपत्रीं त्याने आपले नांव 'नरसिंगराव नारायण' असे लिहिलेलें आमच्या पहाण्यांत आहे. पुढे पेशव्यानीं नरसिंगरावाचा इचलकरंजीकरांच्या घराण्याशी संबंध तोडून टाकिला व खांबोटी हा गांव व दुसरी उत्पन्नें पुणेंप्रांती त्यास दिलीं. त्यावरून तो तिकडेच राहूं लागला. असो. हा मुलगा नारोपंतानीं बाळगला होता तरी पुत्र होण्यासाठीं लक्ष्मीबाईचे नवस सायास सुरूच होते. पटवर्धन जहागीरदारांचे मूळ पुरुष हरभटजीबावा हे त्या वेळीं कोंकण सोडून रहावयास घांटावर आले होते, हे