काय, पण तिजपेक्षांही दुर्घट अनेक गोष्ट एकदम करूनसुद्धां टाकिल्या! महादजी शिंदे पंचवीस हजार फौजेसह घेरा देऊन बसले असतां व टेंबलाईच्या माळावरून 'महाकाळी' तोफेचा भडिमार करीत असतांही जें करवीर शहर डगमगले नाही, तें आतां निसबेटसाहेबांच्या आठशे शिपायानीं गोळी न वाजवितां खुशाल काबीज केलें! पन्हाळा, सामानगड, भूधरगड ही केवढीं अजिंक्य स्थळें! आणि आतां तीं ताब्यांत घेण्यासाठी कोण गेले, तर पंचवीस शिपाई, एक चपराशी आणि एक सोजीर!!! काशीयात्रेस जातों म्हणून छत्रपतीनीं भय दाखवितांच ज्यांनी गडबडून जावें, व सावगांवच्या लढाईंत छत्रपतींचे रक्त भूमीवर पडले म्हणून ज्यांनी शांति करावी, ते छत्रपतींचे नोकर पेशवे आतां ब्रह्मावर्तास स्वस्थपणें 'हरि हरि' म्हणत बसले होते! कोणाची भीड मुरबत न धरितां न्यायाची गोष्ट असेल तीच करणाऱ्या परक्या इंग्रज अंमलदारास ‘काशीस जातों' म्हणून भय दाखविण्यांत कोणत फायदा ? वस्तुतः करवीरच्या महाराजांची अजय्यता व त्यांच्या किल्लेकोटांची अभेद्यता ही बहुतांशीं त्यांच्या धनीपणाच्या नात्यावर अवलंबून होती. पेशवाई बुडाल्याबरोबर हें धनीपणाचें नातें लटकें पडलें व त्याबरोबर अजय्यता व अभेद्यता पार नाहींशी झालीं! आपण कोण होतों व कोणाशीं कसें वागलों, एवढेंच मनांत वागवून व्यवहार चालत नाही. तूर्तच्या स्थितींत आपण कोण आहों व कोणाशीं वागावयाचें आहें हेंही ध्यानांत ठेविलें पाहिजे!बुवासाहेबमहाराजानीं इकडे लक्ष दिलें नाहीं व पूर्वीप्रमाणे आपण किती दंगा केला तरी इंग्रजसरकार सबुरी करील अशा घमेंडीवर जाऊन शेवटीं ते पस्ताव्यांत पडले ! स० १७७४ पासून दक्षिणमहाराष्ट्रांत करवीरकर छत्रपतींची जी भालेराई उत्पन्न झाली होती तिचा शेवट स. १८२७ त झाला तो कायमच झाला!
पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१७९
Appearance