Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१८०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१७०)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 वर लिहिल्याप्रमाणें महाराजांचा व इंग्रजसरकाराचा तह होऊन चोहोंकडे बंदोबस्त झाल्यावर महाराजांकडून कोणा संस्थानिकाचें किती नुकसान झालें याची चौकशी झाली; व नुकसान भरून देण्याची महाराजांस ऐपत नसल्यामुळे त्यांचे शिरोळ वगैरे गांव जप्तींत ठेवून इंग्रजसरकाराने ज्यांचीं त्यांचीं नुकसानें हप्तेबंदीने भरून देवविलीं, त्यांत इचलकरंजीकरांस ४८६१७ रुपये नुकसान भरून मिळालें.
 इचलकरंजीकरांकडून ताबेदारी कबूल करविण्यासाठीं कोल्हापूरच्या महाराजानीं स्वाऱ्या व लुटालूट जाळपोळ अनेक वेळां करून उपद्रव दिला, परंतु पुन्हा असला उपद्रव महाराजांकडून न व्हावा असा इंग्रजसरकारानें बंदोबस्त केला; तेव्हां अर्थात् हें ताबेदारीचें प्रकरण अथवा 'इलाखा प्रकरण' आतां कागदोपत्रीं व तोडजबानी जारीनें सुरू झालें! धारवाडचे सरकलेक्टर हेच त्या वेळीं कोल्हापूर व दक्षिण महाराष्ट्राचे पोलिटिकल एजंट होते. त्यांपुढे उभय संस्थानांच्या वकिलानीं आपआपल्या पक्षाचें समर्थन करण्याकरितां कागदपत्र व तकरारी गुजरल्या, करवीरकर महाराजांचें म्हणणें कीं, इचलकरंजीकरांकडे मुलूख व वतनबाब वगैरे आहे ती सर्व कापशीकरांची व आपली देणगी असल्यामुळें हे आपले ताबेदार आहेत. इचलकरंजीकरांचे म्हणणें कीं, आपण करवीरकरांचा कांही एक संबंध जाणीत नाहीं. कापशीकरांनी आम्हांस जें जें इनाम दिले तें तें सर्व शाहूमहाराजानीं पुन्हा इनाम करून देऊन आम्हांकडे चालविलें व त्या शिरस्त्यास अनुसरून पेशवे सरकारांतूनही आजपर्यंत चालविण्यांत आलें; सातारा राजमंडळाची शंभर वर्षांवर वहिवाट होऊन गेली. आतां करवीरकरांचा काय संबंध राहिला?