पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३४ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

तर यजमानांस कैदेत ठेवावयाचें तें सरकारांतून होऊं नये. आम्हीच त्यांस प्रतिबंधांत ठेवूं. संस्थानाच्या जप्तीवर जो मनुष्य नेमावयाचा असेल तोही आमच्या मार्फतीचा असावा. त्याच्या आमच्या विचारें दौलतीचा खर्च चालवून आम्ही कर्जाची फेड करूं. या गोष्टी आम्ही खरोखर करीत आहों कीं नाहीं याविषयीं देखरेख मात्र सरकारची असावी. " रमाबाईनीं याप्रमाणें कळविल्यावरून संस्थानची जप्ती व व्यंकटरावांस कैद या गोष्टी मात्र सरकारांतून तत्काळ झाल्या. परंतु त्याजपुढच्या गोष्टी अमलांत आणण्याविषयीं रमाबाईची लौकर दाद लागेना. शेवटीं ओरड करितां करितां एकदांची दाद लागली. सुमारे पंचवीस तीस वर्षे संस्थानचा कारभार महादाजी विठ्ठल फडणीस पहात होते त्यानींच यापुढेही रघुनाथराव कुरुंदवाडकर यांच्या देखरेखीखालीं कारभार पहावा, खर्च कमी करून सावकारांचें कर्ज हिस्सेरशीनें फेडीत जावें, व्यंकटरावांनीं एक वर्षभर कृष्णातीरीं टाकळी येथें प्रतिबंधांत रहावें, त्या मुदतींत त्यानीं आपली वर्तणूक सुधारल्यास सरकारमार्फत त्यांस प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घ्यावें, तेथपर्यंत त्यानीं बहिष्कृत रहावें, अलीकडे त्यानीं अव्यवस्थितपणें कोणास गांव वगैरे इनाम दिले आहेत ते काढून घ्यावेत. याप्रमाणें सरकारातून याद ठरून व्यवस्था झाली. सरकार सांगेल त्या ठिकाणीं रहाण्यास कबूल आहों, आपणास पुत्रसंतान नाही याकरितां बायकोच्या मनांत दत्तक घ्यावयाचा आहे तो तिनें खुशाल घ्यावा, आपली आडकाठी नाहीं; या गोष्टी व्यंकटरावानीं मुकाटयाने कबूल केल्या. टाकळीस मात्र रहावयाचें त्यांच्या मनांत नव्हतें, परंतु त्यांस तेथेंच ठेवण्यांत आलें.
 टाकळीस जाऊन राहिल्यावर व्यंकटरावांची चित्तवृत्ति फार उदास झाली. "सरकारची आपणावर इतराजी, बायको व कारभारी आपणास स्वच्छंदपणें वागूं देत नाहींत.