Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१२८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

शिराळेंकर भोसले, शिवाजी थोरात, बाबूराव दादाजी, अंताजी शामजी व हणमंतराव जाधव यांचीं पथकें दिलीं. व्यंकटरावानीं कांहीं नवीन फौज चाकरीस ठेविली व हीं पथकें येऊन मिळाल्यावर प्रथम कित्तूरकरावर स्वारी केली, ते जवळ जातांच कित्तूरकरानें चंदगडचा वेढा उठवून पलायन केलें. नंतर व्यंकटरावानीं गोकाक प्रांतीं येऊन कोणूर वगैरे ठाणीं घेतलीं व त्या प्रांतांत व करवीरकरांच्या तालुक्यांत हिंडून घासदाण्याबद्दल ४०००० रुपये वसूल केले.
 इंग्रजांची फौज बोरघाट चढून आली तेव्हां मराठ्यांनी तळेगांव येथें त्यांचा पराजय केला. दादासाहेब येऊन शिंद्यांचे स्वाधीन झाले. इंग्रज परत मुंबईस गेले. त्या अवधींत सुरापुरचा बंदोबस्त करून परशुरामभाऊ मिरजेकडे आले व करवीरकरांवर हंगाम सुरू करून त्यानीं अकीवाटचें ठाणें घेतलें. त्या समयीं त्यांस इचलकरंजीहून मोर्च्यांचा सरंजाम व पायदळ यांचा पुरवठा झाला होता. पुढच्या वर्षी भाऊनीं शिरोळचें ठाणें घेतलें. अलीकडे मानाजी शिंदे व सटवोजी भोंसले पन्हाळ्याच्या आश्रयास राहून पेशव्यांच्या मुलुखांत लुटालूट करीत असत. सबब त्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामावर व्यंकटरावांस कांहीं फौजेसह नेमून परशुरामभाऊ कित्तूरकरांचें पारिपत्य करण्याकरितां तिकडे कूच करून गेले. पेशव्यांचीं ठाणीं कोल्हापूरपर्यंत लागत गेलीं होतीं त्यांचा बचाव व्यंकटरावानीं यथास्थित केला. करवीरकरानीं वडगांवावर स्वारी केली, परंतु व्यंकटराव त्यांवर चालून जातांच ते पळून गेले. मानाजी शिंदे व सटवोजी भोंसले यांचा मात्र पाठलाग त्यांचे हातून झाला नाहीं, त्याबद्दल रागें भरून नाना फडनविसानीं त्यांस एक खरमरीत पत्र लिहिलें व आपणाजवळ फौज नाही ही सबब त्यानीं पुढें न आणावी म्हणून प्रतिनिधीचे पांचशें स्वार त्यांच्या कुमकेस पाठविले.