Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(११२)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

असेपर्यंत पेशवाईविरुद्ध आचरण किंवा फंदफितूर त्यानीं कोणचाही केला नाहीं. आधीं नसते उपद्व्याप करणें, आणि मागून त्यांतून आम्ही कसे शिताफीनें निसटलों म्हणून फुशारकी मिरविणें, हें त्यांस आवडत नसे. आपल्या आज्ञेची अमर्यादा यांस काडीमात्र सहन होत नसे. सातारच्या राजमंडळांत प्रधानांचें प्रस्थ मानून छत्रपति निर्माल्य झाले ही गोष्ट यांच्या डोळ्यांपुढें असल्यामुळें आपल्या राज्यांतला सर्व कारभार आपल्या एकट्याच्या तंत्रानें चालावा हा त्यांचा हेका आम्हांस गैरवाजवी वाटत नाही. त्यांच्या राज्यांत पुष्कळ अव्यवस्था माजली होती ती मोडावी हणून पेशव्यांनीं आपल्यातर्फेचा कोणी मुसद्दी त्यांस कारभारी नेमून द्यावा असें योजिलें होतें, परंतु ती गोष्ट कबूल करण्याचें त्या बाईनीं साफ नाकारिलें. त्यांना वाटे कीं, ही अव्यवस्था पुरवली, पण अधिकाऱ्यांचें प्राबल्य नकाे!
 जिजाबाई वारल्या या सालच्या अखेरीस माधवराव पेशवे मृत्यु पावले व त्यांच्या जागीं नारायणराव यांची स्थापना झाली. ता. १९ जानेवारी सन १७७३ रोजीं नारायणराव पेशवे यांचा व कोल्हापूरकरांचा बेवीस कलमांचा करार झाला त्यांत चिकोडी व मनोळी हे तालुके करवीरकांस मिळाले व त्यांबरोबर अर्थात् लाट व रांगोळी हे गांव तिकडे गेले. परंतु हा ठराव कागदपत्रीं मात्र झाला. तो अमलांत आला नाहीं. कारण कीं, नारायणराव यांचा खून झाल्यानंतर रघुनाथराव दादासाहेब हे पेशवे झाले. त्यानीं “अनूबाईकडे लाट व रांगोळी हे गांव आहेत त्यांस उपद्रव देऊं नये” असें कोल्हापूरचे कारभारी येसाजी शिदे यांस पत्र लिहिलेलें आहे.
 रघुनाथराव दादासाहेब यांस पेशवाई प्राप्त झाल्यावर ते कर्नाटकांत मोहिमेस गेले. तो इकडे सखारामबापू, नाना फडनवीस,