Jump to content

पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(१११)
दुसरे व्यंकटराव नारायण.

अनादर होता असें दिसून येत नाहीं. त्यांचे पुष्कळ विश्वासू मंत्री व इतर सेवक ब्राम्हणच होते. ब्राम्हण्याचें म्हणजे ब्राम्हणधर्माचें वर्चस्व मात्र त्या फारसें मानीत नव्हत्या हें खरें आहे. त्यानीं शंभु छत्रपतींच्या समाधीवर ब्राह्मणांकडून सक्तीनें रुद्राभिषेक करविले व श्रीशंकराचार्य नको म्हणत असतांही त्या समाधीच्या आवारात ब्राम्हणभोजनें करविलीं; यावरून वेदोक्ताच्या तंट्याचें मूळ जिजाबाईंच्या कारकीर्दीपासून उत्पन्न झालें असें आम्ही समजतों! त्यांचा स्वभाव पराकाष्ठेचा संशयी होता. तो इतका कीं, कोणी ब्राम्हणानें श्रीमहालक्ष्मीच्या पूजेस अंमळ उशीर लाविला तर आपला नाश करण्यासाठी हा कांही अनुष्ठान करीत आहे असा त्यांस संशय येई! हे आम्हीं जिजाबाईचे दोष म्हणून सांगितले आहेत त्याप्रमाणें आम्हांस त्यांचे गुणही घेतले पाहिजेत. राज्यकारभारापुरतें पाहिले तर त्यांच्या नानाविध गुणाच्या तेजांत असले दोष सहज लोपून जातात. हल्लीं करवीरचे राज्य आहे म्हणून त्याची स्थापना करण्याचे सर्व श्रेय जिजाबाईंस आहे. त्यानींच म्हणून तें कार्य सिद्धीस नेलें! इतर कोणाच्याही पराक्रमानें अथवा चातुर्यानें हें राज्यस्थापनेचें काम झालें नसतें. त्यांची हिंमत, मसलतीचे धोरण, मनाची दृढता व कुलाभिमान हे गुण वर्णनीय होते. ताराबाई व जिजाबाई यांच्या स्वभावांतलें अंतर हेंच आहे कीं, ताराबाईंस दंगा करावा, खटपटी कराव्या, अंमल गाजवावा, एवढे मात्र समजत होते; परंतु हे सर्व केल्याने जे आपल्या मनांत आहे हे सिद्धीस जाईल किंवा न जाईल हे त्यांस कळत नव्हतें! जिजाबाईंची गोष्ट तशी नव्हती. आपले व प्रतिस्पर्ध्याचे बलाबल किती आहे, देशकालाप्रमाणें कसें वागलें असता आपलें कार्य साधेल, आपल्या प्रभुत्वाची मर्यादा कोठपर्यंत चालेल, हें सर्व त्या जाणत होत्या. त्यांनी घेतलेला दत्तक ज्या दिवशी माधवराव पेशव्यांनीं मान्य केला त्या दिवसापासून जीवात्मा