पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१२३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(११३)
दुसरे व्यंकटराव नारायण.

हरिपंत, त्रिंबकराव मामा इत्यादि मुत्सद्दी व सरदार लोकांनीं सातारकर छत्रपतींकडून पेशवाईचीं वस्त्रे मयत नारायणराव पेशवे यांची बायको गंगाबाई यांचे नांवें आणवून राज्यकारभार हांकण्यास सुरुवात केली. अनूबाई गंगाबाईच्या पक्षास अनुकूल झाल्या व त्यांचे जावई त्रिंबकराव मामा हे गंगाबाईच्या फौजेवरचे मुख्य सरदार झाले. यानंतर रघुनाथराव यांची व कारभा-यानीं अनुकूल करून घेतलेल्या फौजेची लढाई सुरू होण्याचा प्रसंग आला; त्या वेळीं गायकवाड, भोसले व हुजरातेपैकी राजपथकी सरदार होते त्यानीं हरकत घेतली की, दादासाहेबांस पेशवाईची वस्त्रे छत्रपतींनीं दिलेलीं आहेत, त्यांची पेशवाई काढून घेतल्याबद्दल छत्रपतींचे पुनः आज्ञापत्र मिळाल्याखेरीज आम्ही दादासाहेबाशी लढणार नाहीं! त्यामुळे कारभाऱ्यांस सातारच्या छत्रपतींकडून तशा अर्थाचे आज्ञापत्र मिळवावे लागलें. छत्रपति नामधारी होते हे जरी सर्वांस ठाऊक होतें, तरी आपणावरचा बंडखोरपणाचा दोष घालविण्यासाठी आपल्या तलवारीच्या टोकास छत्रपतींच्या आज्ञापत्राचें चिटोरें अडकविणें त्या बलाढय सरदारांस भाग पडलें ! मग भोसले, गायकवाड वगैरे आपापल्या फौजा तयार करून त्रिंबकराव मामास येऊन मिळण्यास सिद्ध झाले.
 वर सांगितलेले सरदार येऊन मिळण्यापूर्वीच दादासाहेब व त्रिंबकराव यांचें युद्ध पंढरपुराजवळ होऊन त्यांत त्रिंबकराव मारले गेले. तेव्हां वेणूबाईचे सांत्वन करण्याकरितां अनूबाई व व्यंकटरावदादा पुण्यास गेलीं. दादांच्या मातोश्री लक्ष्मीबाई मात्र इचलकरंजींत राहिल्या. तो राज्यक्रांतीचा काळ असल्यामुळें जामदारखाना व काय थोडें जडजवाहीर होतें तें अनूबाई पुण्यास घेऊन गेल्या व तें सर्व त्यानी पुरंदर येथें पेशवेसरकारच्या जामदारखान्यांत नेऊन ठेविलें.१५