पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९९ )
नारायणराव व्यंकटेश.

त्यांस व त्यांच्या स्त्रियेस यापुढें अनूबाईनीं नजरकैदैतच ठेविल्याप्रमाणें स्थिति होती! या सुमारास कडलास येथील देशपांडयाच्या मुलीशीं त्यांनीं लग्न केलें असें ऐकण्यांत आहे. नानासाहेब पेशवे यानीं देशस्थाच्या मुलीशीं लग्न लाविलें हें मामेबंधूचें उदाहरण पाहून तात्यानींही त्याचप्रमाणे केलें! लोकरूढीस न भितां त्यानीं असली गोष्ट केली म्हणून त्याबद्दल यांस कोणी सुज्ञ मनुष्य विशेष दोष देणार नाही. पण दुसऱ्या कांहीं गोष्टींत अलीकडे त्यांचे जें बेफामपणाचें वर्तन सुरू होतें त्या वर्तनानें ते राज्यकारभारासारख्या व सरदारीसारख्या जबाबदारीच्या कामास अगदीं नालायख झाले होते. अनूबाई, खुद्द पेशवे, त्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यानीं व इतर पुष्कळ थोर लोकांनीं त्यांस दुर्व्यसनांपासून परावृत्त करावें म्हणून बहुत यत्न केला,धाक घालून पाहिला, निष्ठुरपणानें व कडकपणानें वागवून पाहिलें,पण सर्व व्यर्थ!
 स० १७६२ त पेशव्यांची स्वारी पुण्यास गेल्यावर दादासाहेबांचें व त्यांचे भांडण झालें व दादासाहेब रुसून मोंगलांकडे निघून गेले आणि त्यांची कुमक आणून पेशव्यांवर चालून आले. पेशव्यांचे बाजूस जे सरदार होते त्यांत अनूबाईचे जामात त्रिंबकराव मामा व गोपाळराव पटवर्धन हे होते. अनूबाईही पेशव्यांच्या बाजूस होत्या व त्यांचें पथक घेऊन विसाजी नारायण हा दादासाहेबांशी झालेल्या लढायांत कामगिरीवर हजर होता. त्या लढायांत दादासाहेबांची सरशी होऊन पेशवे त्यास जाऊन भेटले व सर्व कारभार त्यांजकडे सोपवून त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागण्यास कबूल झाले. नतर पटवर्धनांपासून मिरज घ्यावी म्हणून दादासाहेब व पेशवे मोठी फौज घेऊन आले तेव्हां विसाजी नारायण त्यांबरोबर होता. मिरजेस मोर्चे वसविले तेव्हां मोर्च्याचे सामान व पायदळ वगैरे कुमक इचलकरंजीहून पेशव्यांस होत होती.