पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(९८)
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

ध्यानांत ठेविलें पाहिजे. त्या काळची स्थिति पहातां हैदराबाद, म्हैसूर, अर्काट, मुर्शिदाबाद, दिल्ली वगैरे ठिकाणीं तोच प्रकार चालू होता असें कोणासही दिसून येईल. जुने वृक्ष मोडून पडल्यामुळें त्यांच्या बुंध्यांतून नवे कोंब उत्पन्न होऊन जोरानें वर येण्याचा तों काळ होता!
 पेशवाईंतील प्रसिद्ध मुत्सद्दी व सरदार यांच्या कृत्यांसंबंधे हल्लींच्या काळांत चर्चा होते तेव्हां अमक्यानें अमुक केले असतें तर अमुक झाले असतें असें पुष्कळ टीकाकार बोलत व लिहीत असतात. परंतु पेशवाईची घटना कशी होती, तिचे अधिकारी कोणत्या बंधनांनी बांधले गेले होते, हें माहीत नसल्यामुळें ही टीका बहुधा अप्रयोजकपणाची असते हें समजून, आपल्या देशाच्या इतिहासाचे यथार्थ ज्ञान वाचकवर्गास व्हावे या बुद्धीनें, आम्हीं वर आलेले विवरण दिग्दर्शकरूपाने केलें आहे. याविषयीं अधिक विस्तार करण्यास येथे अवकाश नाहीं. असो. हा विषय बाजूला ठेवून आम्ही मुख्यतः ज्या संस्थानाचा इतिहास लिहीत आहों त्या संस्थानातल्या घडामोडींकडे पुनः वळतों.
 अनूबाईचें व तात्यांचें सौरस्य पुन्हां कमी होऊन तात्या धारवाडाकडेच गेल्या पावसाळ्यापासून होते. हल्ली स. १७६२ त लष्करांतून फुटून ते इचलकरंजीस जाऊं लागले तेव्हां पेशवे व त्रिंबकराव यांजवळ त्यांनी कबूल केलें कीं, आपण मातुश्रीस बरोबर घेऊन लवकरच पुण्यास येतों. पण इचलकरंजीस गेल्यावर त्यांची बुद्धि फिरली! पुण्यास जाण्याचें त्यानीं साफ नाकारलें, व ते कारभारांत व खाजगी वागणुकींत अव्यवस्थितपणा करूं लागले. संस्थानचा कारभार पूर्वीपासून अनूबाईनींच आटपल्यामुळें तात्यांचें कांहींच चालत नव्हतें.