मराठ्यांनीं निकरानें वारंवार युद्धें केल्यामुळें निरुत्साह होऊन तो परत भागानगरास गेला.
याप्रमाणें पुणें प्रांतीं मोंगलांशी युद्ध सुरू असतां नारायणरावतात्या धारवाडाकडे गेले होते. त्यांनीं त्या म्हणजे सन १७६१ च्या डिसेंबरांत कोपळावर स्वारी केली. तिकडे काटकांनीं दंगा करून ठाणी घेतली होती त्यांचे एक महिन्यांत पारिपत्य करून ते गजेंद्रगडास येऊन तेथून बागलकोटाकडे गेले. तेथेंही काटकांचा दंगा सुरू असून त्यांनी कटगिरें नांवच्या ठाण्यास वेंढा घातला होता म्हणून त्यांची स्वारी तिकडे झाली होती. सन १७६१ च्या पावसाळ्यात अनुबाई व लक्ष्मीबाई धारवाडास होत्या. लक्ष्मीबाई यात्रेकारितां व्यंकोबाच्या गिरीस जाऊन अनुबाईंच्यापूर्वीच इचलकरंजीस परत आल्या.
निजामअल्लीची स्वारी पुण्यावर होत असतां कोल्हापूरकरांनी आजरें तालुक्यावर व इचलकरंजीच्या आसपासच्या गांवांवर स्वारी केली. परंतु पुढें लौकरच निजामअल्ली परत गेला व पेशव्यांची फौज कर्नाटकच्या स्वारीस निघाली, या बातम्या आल्यामुळे कोल्हापूरकरांचे अवसान खचून ते परत आपल्या हद्दीत गेले. मुरारराव घोरपडेही आपल्या हातून जिजाबाईंचें साहाय्य होण्याजोंगें नाहीं असें पाहून सोंडूर येथेंच स्वस्थ राहिला.
आजरें तालुक्यावर कोल्हापूरकरांची स्वारी नुकतीच येऊन जाते तोंच तेथील देसाई होता त्यानें बंडावा सुरू केला. शिवाय चिकोडी तालुक्यांतील कोणी बेरड वारंवार त्या आजरें तालुक्यांतल्या गांवांवर घालें घालीत असे. या दंग्यांचा बंदोबस्त अनूबाईंनीं पेशव्यांचे ताकीदपत्र आणवून केला.