पान:इचलकरंजी संस्थांनचा इतिहास.pdf/१०२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ९२ )
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास.

 मोंगल परत गेल्यावर पुण्याच्या दरबारांत दुफळी होऊन माधवराव पेशव्यांची आई गोपिकाबाई व रघुनाथराव दादासाहेब यांमध्ये वितुष्ट आल्यामुळें दादासाहेब व सखारामबापू कारभार सोडून घरीं बसले. नंतर प्रसिद्ध नानाफडनवीस यांचे चुलते बाबूराव फडणीस व त्रिंबकराव मामा पेठे यांस गोपिकाबाईंनीं कारभारी नेमिलें. नंतर दादासाहेबांची कशी बशी समजूत होउन ते व नूतन पेशवे व कारभारी त्रिंबकराव मामा असे सन १७६२ च्या फेब्रुवारींत कर्नाटकच्या स्वारीस निघाले. त्यांबरोबर फौज होती तींत इचलकरंजीकरांचे पथक विसाजी नारायण याचे हाताखाली होतें. बरेच दिवस कृष्णतीरीं येडूर येथें या लष्कराचा तळ पडला होता. या प्रसंगी दादासाहेबांनीं ' जयराम स्वामीचें ' वडगांव लुटून फस्त केलें , व करवीरच्या राज्यांत आणखी थोडीबहुत धामधूम केली. त्यांजवळ व पेशव्यांजवळ जिजाबाईंनीं कबूल केलें कीं, कुसाबाईस पुत्र झाल्याचें वर्तमान आपण खोटेंच उठविलें होतें !
 स्वारीचें काम आटपून माधवराव पेशवे व त्रिंबकरावमामा पुण्यास जाऊन पोंचतात तों त्यांच्या मागोमाग जिजाबाईंची स्वारी करवीराहून निघून तेथें दाखल झाली. करवीरच्या राज्याचें पुढें काय करावयाचें याचा निर्णय पेशव्यांच्या बाजूनें अद्यापी व्हावयाचा होता. तो निर्णय आपल्या मताप्रमाणें व्हावा म्हणून जिजाबाईनीं सामोपचार, कारस्थानें व दांडगाईही करून पाहिली,परंतु यांपैकी कोणचाच उपाय फलद्रूप होण्याचा त्यांस रंग दिसेना. शेवटीं त्रासून त्रागा करण्याची भीती दाखविण्याचा एक उपाय राहिला होता तेवढा या प्रसंगी करून पाहण्याचे जिजाबाईनीं योजिलें होतें. त्यांचा हेतु तडीस जाण्यास ती वेळही समर्पक होती ! नानासाहेब,भाऊसाहेब व विश्वासराव हे तीन पुरुष वारल्यामुळें व पानपतचें युद्ध झाल्यामुळें पेशव्यांचे घराणे दुःखाने व काळजीने ग्रासलें होतें. ताराबाई जिवंत होत्या तोंवर नाना-