पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नात्याचा अजून एक प्रकार आहे. त्याला ओपन नाती (Open Relationships) म्हणतात. या नात्यात दोघंजण एकत्र राहतात. एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवतात. पण प्रत्येकाला इतर व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध ठेवायची मुभा असते. बाहेर कुणाबरोबर लैंगिक संबंध केले म्हणजे आपल्यातील प्रेम कमी होत नाही अशी त्यांची धारणा असते. “आमची ओपन रिलेशनशिप आहे. आम्ही दोघंही स्वतंत्रपणे इतरांबरोबर सेक्स करतो. यात आम्हाला काहीही विशेष वाटत नाही. खरं तर हा मुद्दा आपल्या नात्यात महत्त्वाचा नाही हे ठरविल्यानंतर डोक्यावरचा मोठा ताण कमी होतो. यामध्ये दोन काळज्या घ्याव्या लागतात. एक नेहमी आणि व्यवस्थितपणे कंडोम वापरायचा. दुसरी गोष्ट कधी कधी आपण एखाद्याच्या प्रेमात पडून वाहवत जाऊ शकतो. असं वाटत असेल तर लगेच माघार घ्यायची. आपल्या बॉयफ्रेंडबरोबर जे नातं आहे त्याला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायचं. आम्ही अनेक वर्ष एकत्र राहत आहोत आणि आतापर्यंत ही व्यवस्था उत्तम चालली आहे. " " जोडीदार आऊट आहेत का? जोडीपैकी दोघंही जण 'आउट' नसतील तर पुढे हे नातं कसं टिकणार यावर आधीच विचार व्हायला हवा. काहीजण आम्ही दोघंही (भिन्नलिंगी) लग्न करणार आणि तरीही हे नातं चालू ठेवणार असं ठरवतात. “त्यानी लग्न केलं, त्याला मुलं झाली. मला त्यानी सांगितलं की, तू घाबरू नकोस. लग्न कर. सर्व ठीक होईल. मीही लग्न केलं. मलाही मुलंबाळं आहेत. अधूनमधून अजूनही मला त्याचा सहवास लाभतो.” “मी लग्न केलं, त्यानी नाही केलं. अधूनमधून आम्ही भेटतो. पण आता पूर्वीसारखं नाही राहिलं. संसाराचा गाडा ओढताना मला त्याला वेळ देता येत नाही. घरच्यांकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं. सुखदुःखाच्या वेळी तो जवळ असावा असं वाटतं. पण नसतो. याचा काही वेळेला खूप त्रास होतो. पण काय करणार?" काहीजणांना, आपल्या जोडीदाराने भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न करून, आपल्याबरोबर लपूनछपून नातं चालू ठेवावं ही कल्पना पटत नाही. त्यांना ते चुकीचं वाटतं, कमीपणाचं वाटतं. “तो म्हणाला की, 'मी लग्न करून सुद्धा तुझ्याशी नातं ठेवीन.' मला खूप वाईट वाटलं. त्याला सरळ सांगितलं की, 'तुझं लग्न झालं की परत तुझं तोंड बघणार नाही.' त्याचं लग्न झालं. याला बरीच वर्षं झाली. अजूनही अधूनमधून तो माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतो. मी भीक घालत नाही, घालणार नाही.” जर जोडीतला एकच जण 'आऊट' असेल तर जो 'आउट' आहे त्यालाच सारखी तडतोड करावी लागते. त्याचाच जास्त कोंडमारा होतो. आज ना उद्या जोडीदार 'आउट' होईल या आशेवर तो असतो. जर असं जाणवायला लागलं की त्या अर्धवट इंद्रधनु... ९९