पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिसतं. “मी खूप रडायचो. त्यानी माझ्याबरोबर रहावं म्हणून विनवण्या करायचो. तो उसने पैसे मागायचा, ते मी आनंदाने द्यायचो. ते पैसे मी परत सुद्धा कधी मागितले नाहीत. उलट हक्कानी तो माझ्याकडे पैसे मागतो याचा आनंद वाटायचा. वर्षापूर्वी त्याला रिक्षा घ्यायला मी माझ्या बँकेतील सगळे पैसे काढून दिले. तेव्हापासून त्याचं माझ्याकडे येणं कमी व्हायला लागलं. मग मी आजारी पडलो. त्याला निरोपावर निरोप धाडले. हा एकदाही फिरकला नाही. कळलं की तो एका दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरतोय.” काही जोडप्यांमध्ये छळ, मारहाण होताना दिसते. यातले अनेकजण झालेला अन्याय चूपचाप सहन करतात. 'त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो अधिकार दाखवतोय. त्यात चुकीचं काय?' असं विचारतात. त्याच बरोबर मनात एक भीती असते की, हा मिळायला एवढी वर्ष लागली, जर हा मला सोडून गेला तर मला परत कोण मिळणार? आणि मिळाला तरी कशावरून तो चांगला असेल? काही नाती ही पैशाकडे डोळा ठेवून जोपासली जातात. एखादी सामान्य आर्थिक परिस्थितीची व्यक्ती, दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीबरोबर पैशासाठी राहू शकते. श्रीमंत वृद्ध पुरुष एका तरुण पुरुषाला ठेवतो. तो तरुण पुरुष पैशासाठी हे नातं स्वीकारतो. जर त्या तरुणानी लैंगिक सुखासाठी इतर जोडीदार शोधला तर तो वृद्ध पुरुष मत्सराने ग्रासून जातो. त्या तरुणाला या ना त्या मार्गाने मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या तरुणाची गरज संपली किंवा त्याला या नात्यानी गुदमरायला झालं, की तो या नात्याला राम राम ठोकतो. एकनिष्ठ राहणं जोडीदाराशी एकनिष्ठ राहणं हा आपल्या नात्याचा पाया आहे का? काही जण हे गृहीत धरतात की दोघांनी लैंगिकदृष्टया एकनिष्ठ असलं पाहिजे. आपल्यामधील विश्वासाचा आणि प्रेमाचा हा एक मोठा पाया आहे. "आम्ही एकनिष्ठ आहोत. आम्हाला हे नातं टिकवायचं आहे. आपला संयम सुटला तर इतर कोणतंही कुंपण हे नातं सुरक्षित ठेवायला उपलब्ध नाहीये. इतर कुणाच्या प्रेमात पडणं, त्याच्याबद्दल लैंगिक भावना निर्माण होणं हे गुण प्रत्येक माणसात आढळतात. पण त्याच्यासाठी आमचं नातं संकटात यावं असं आम्हाला वाटत नाही. आम्ही 'गे' पार्टीजना सुध्दा जायचं टाळतो. हे नातं मिळवायला आणि जोपासायला आम्ही खूप कष्ट घेतले आहेत. जे मिळवलं ते मोलाचं आहे आणि ते काही केल्या आम्हाला गमवायचं नाही.' " विवेक आनंद म्हणाले, "वैयक्तिकदृष्ट्या माझा नात्यावर विश्वास नाही. मला वाटतं सुरवातीचा प्रेमाचा कालावधी ओसरला की, ते कंटाळवाणं, रटाळ होतं. पण जर नातं ठेवायची इच्छा झाली तर एकाशीच ठेवीन. मग ते कितीही कंटाळवाणं झालं तरी चालेल. माझा ओपन रिलेशनशिपवर विश्वास नाही.” इंद्रधनु. ९८