पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थितीतच जोडीदाराला सदैव राहायचं आहे, 'आउट' व्हायचं पाऊल उचलायला तो तयार नाही, तर अशा वेळी भांडणं, मानसिक त्रास होणं स्वाभाविक असतं. हे वाद विकोपाला जाऊन नातं तुटू शकतं. “मी 'आउट' आहे पण माझा बॉयफ्रेंड 'आउट' नाही. आम्ही अनेक वर्षं एकत्र राहत आहोत. त्याच्या घरच्यांना वाटतं की आम्ही रूममेटस् आहोत. जेव्हा त्यांना कळेल तेव्हा काय होईल हे माहीत नाही. पण त्यांना काहीही वाटलं तरी आमचं नातं तुटणार नाही.' "मला तिच्या बरोबर रहायचंय पण ती धाडसच करत नाही. मी तिला किती वेळा म्हटलं की घरच्यांना सांग, जे होईल ते बघून घेऊ. आमची यावरून अनेक वेळा भांडणं झाली आहेत. काही दिवस मग आम्ही एकमेकींशी बोलत सुद्धा नाही. मग परत जवळ येतो. डोक्याला किती त्रास होतो! जास्तीत जास्त काय होईल, घरचे लोक बाहेर काढतील. काढू देत. आम्ही दोघीही नोकरी करतो. स्वतःच्या पायावर उभ्या आहोत मग असं अधांतरी किती दिवस रहायचं?” दोघातला एकच जण 'आऊट' आहे अशा नात्यात सामाजिक अडचणी खूप येतात. दोघांना जोडीने फिरता येत नाही. फिरलं तर कुणाला संशय तर येणार नाही ना, ही सदैव काळजी असते. मित्रमंडळी, नातेवाईकांकडच्या समारंभात सगळेजण आपापले जोडीदार घेऊन येतात. तिथे सदैव एकट्याने जावं लागतं किंवा जाणं टाळावं लागतं. अनेक भिन्नलिंगी लोकांनी आजवर या गोष्टी गृहीत धरल्या आहेत, त्यांना या गोष्टी खूप किरकोळ वाटतात. प्रत्यक्षात छोट्या छोट्या गोष्टींमुळेही नात्यावर ताण पडू शकतो. जर दोघं 'आउट' असतील तर जुने प्रश्न सुटतात पण नवीन समस्या उभ्या रहातात. पालकांना, आपला मुलगा घर सोडून दुसऱ्या पुरुषाबरोबर संसार करणार याचा त्रास होऊ शकतो. ते दोघं त्याच शहरात संसार थाटणार असतील तर जास्त त्रास होतो. काही वेळा जर आपला एकुलता एकच मुलगा असेल तर त्यानी घर सोडून जाऊ नये, आपल्यापाशीच राहावं ही आई-वडिलांची इच्छा असते. जर दोन-तीन मुलं असतील तर जो समलिंगी आहे (ज्यानी लग्न केलं नाही) त्यानी आईवडिलांना सांभाळावं ही अपेक्षा असते. याच अपेक्षेबरोबर त्याच्या जोडीदाराने त्या घरात राहू नये हीही अपेक्षा असते. "बाकीच्या दोन भावांची लग्नं झाली आहेत. ते वेगवेगळे राहतात. माझं लग्न झालं नाही. म्हणून सगळ्यांनी हे गृहीत धरलंय की आई-वडिलांना मीच सांभाळायचं. आपल्याला स्वीकारल्याची किंमत मोजावी लागते. मला प्रायव्हसी मिळत नाही. घरी जोडीदाराला आणता येत नाही." इंद्रधनु १००