पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही जण एखादा समलिंगी मित्र मिळवतात व त्याच्या समलिंगी मित्रांची ओळख करून घेतात. त्या प्रत्येकाकडून त्याच्या मित्रांची ओळख करून घेतात व अशा रीतीने आपला समलिंगी मित्रपरिवार वाढवतात. हे सगळं करताना मनात जोडीदाराचा शोध कायम चालू असतो. ज्यांना कॉम्प्युटर वापरता येतो ते ई-मेल लिस्ट, चॅट रूमचा आधार घेऊन जोडीदार शोधायचा प्रयत्न करतात.

जोडीदार मिळाला तरी समलिंगी व्यक्तींना एकांतात भेटण्याची ठिकाणं फार थोडी असतात. जोडीदाराला घरी घेऊन जाता येत नाही. अशा वेळी काही जण सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. "मला त्या पोलिसांनी समज दिली- 'तुम्ही चांगल्या घरचे दिसता, इथे काय करताय? जा इथून तुम्ही.' पण अशी चांगल्या शब्दात समज देणारे पोलिस कमी असतात. बहुतेक पोलिस अशांना चौकीवर नेतात व मारतात. चुकून एखाद्या वेळी भलतीच व्यक्ती पोलिसांच्या हाताला लागू शकते. माझ्या एका मित्राचं उदाहरण- “रात्री १० वाजण्याचा सुमार असेल. हवा खूप थंड होती. येताना लघवीला लागली. मी मुतारीत गेलो. बाहेर आलो व गाडी सुरू करणार तेवढ्यात एकानी माझ्या गाडीची किल्ली घ्यायचा प्रयत्न केला. म्हणाला 'इथे तू काय धंदे करायला आलास?' मी म्हटलं 'मी लघवीला आलो होतो. मी या वाटेनी चाललो होतो. मी कोणताही गुन्हा केलेला नाही.' त्यानी मला जबरदस्तीनं ठाण्यात नेलं. त्याच्या साहेबाने मला सोडून दिलं पण म्हणाला की, 'काय आहे की आपल्या देशात डेमॉक्रसी आहे ना, सगळे माजलेत. पुढच्या वेळी हा तिथं दिसला तर त्याला फोडून काढा". पोलिसांनी त्याला अशी वागणूक देणं चुकीचं होतं. एखादी व्यक्ती भेटली, आवडली, तिच्याशी नातं प्रस्थापित केलं तरी ते नातं या सनातनी समाजात टिकवणं, जोपासणं अवघड असतं. हे नातं जोपासायला कोणाचाही आधार नसतो. दोन्ही जोडीदारांना एकमेकांबद्दल खूप तळमळ असून सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं नातं जोपासण्याचा प्रयत्न करून बाकी सगळं नशीबावर सोडून द्यावं लागतं. खूप प्रयत्नांनी एखादी व्यक्ती मिळाली की, कुठलाही विचार न करता त्या व्यक्तीशी नातं जमवलं जातं. जर आपल्याला दीर्घ काळासाठी नातं हवं असेल तर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो जो केला जात नाही. नातं टिकणं/न टिकणं हे सर्वस्वी आपल्या हाती नसलं तरी नातं जमवायच्या वेळी काही किमान गोष्टींचा विचार केला तर नंतर त्रास कमी होण्याची शक्यता असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघांचं एकमेकांबद्दल भावनिक / शारीरिक आकर्षण असलं पाहिजे. एकतर्फी प्रेम असेल तर त्याला यश येऊ शकत नाही. उदा. दोघातला एक जण समलिंगी लैंगिक कलाचा आहे पण दुसरा भिन्नलिंगी लैंगिक कलाचा आहे. तो समलिंगी पुरुष त्या भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषावर जीव लावून प्रेम करतो. इंद्रधनु... ९५