पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समलिंगी नाती प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की, आपला प्रेमाचा एक जोडीदार असावा. आयुष्याची सुखदुःखं जोडीने उपभोगावी. समलिंगी व्यक्तीही याला अपवाद नाही. अत्यंत प्रतिकूल वातावणात समलिंगी व्यक्ती जोडीदार शोधायचा प्रयत्न करतात, नातं जोपासायचा प्रयत्न करतात. अनेकांना आयुष्यभर जोडीदार मिळत नाही, पण त्यांचा शोध संपत नाही. ज्यांच्या वाट्याला चांगला जोडीदार येतो त्याच्या बरोबर संसार करण्यासाठी काबाडकष्ट घेतात. त्यांची अत्यंत माफक अपेक्षा असते की, समाजाने त्यांना सुखाने जगू द्यावं. त्यांचा कोणाला त्रास देण्याचा हेतू नसतो, कोणाच्या वाट्याला जायचा हेतू नसतो. समाजाला भिऊन संसाराचा गाडा सुखाने ओढायचा ते प्रयत्न करतात. काही जणांच्या जोड्या अजिबात टिकत नाहीत, काहीजण काहीकाळ एकत्र राहिल्यानंतर वेगळे होतात, काहीजण अनेक वर्षं एकत्र राहतात. जशी समजुतदार नाती असतात तशीच जाच करणारी, जोडीदाराची पिळवणूक करणारी नातीही असतात. थोडक्यात भिन्नलिंगी जोडप्यांत जे जे रंग दिसतात ते ते रंग समलिंगी जोडप्यांमध्येही दिसतात. जोडीदाराचा शोध आपल्या समाजात समलिंगी जोडीदार शोधणं अवघड असतं. समलिंगी व्यक्ती बघून ओळखता येत नाहीत. जोवर समोरची व्यक्ती आपली लैंगिकता जाहीर करत तोवर ती व्यक्ती जोडीदार बनू शकेल असा अंदाज लावता येत नाही. जोडीदार शोधायचा असल्यास, (आपल्या लिंगाच्या) समलिंगी असलेल्या व्यक्तीची ओळख होणं आवश्यक असतं. एखाद्या आवडत्या व्यक्तीला स्पष्टपणे त्याची लैंगिकता विचारता येत नाही. त्यामुळे विविध तरल क्लृप्त्यांचा मार्ग वापरून हा अंदाज घ्यावा लागतो. हा सापशिडीचा खेळ अवघड असतो व जोखमीचाही असतो. मिळणा-या प्रतिसादाचा बरोबर अर्थ लावणं महत्त्वाचं असतं. कधी कधी उतावीळपणामुळे, मिळणाऱ्या संदेशाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. समलिंगी व्यक्तीचा उद्देश व्यवस्थितपणे त्या व्यक्तीपर्यंत पोहचला तरी, ती व्यक्ती जर भिन्नलिंगी लैंगिक कलाची असेल तर ती व्यक्ती चिडू शकते. जोडीदाराच्या शोधात काही समलिंगी व्यक्ती कधी कधी अतिरेक करतात. आपल्याकडे दुर्लक्ष केलं तरी एखाद्या भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या व्यक्तीचा पिच्छा पुरवतात (जशी काही मुलं, मुलींचा पिच्छा पुरवतात). यामुळे त्या व्यक्तीच्या मनात समलिंगी लोकांविषयी चीड निर्माण होते. इंद्रधनु ९४