पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो आपल्यापाशी रहावा म्हणून त्याच्यासाठी वाट्टेल ते करतो. भिन्नलिंगी लैंगिक कलाचा पुरुष आपल्याला इतकं महत्त्व मिळतंय याचा पुरेपूर फायदा उठवतो. गरज लागली की जवळ येतो आणि गरज संपली की पाठ फिरवतो. "मला तो खूप आवडतो. त्याच्याशिवाय मला काहीही सुचत नाही. पण तो साला म्हणतो की मी काय तुझ्यासारखा गांडू आहे का? मला शिव्या देतो, वाट्टेल ते बोलतो. गरज लागली की मग दोन-चार दिवस खूप गोड बोलतो. परत माझ्या आशा उंचावतात. मग माझ्याकडे पैसे मागतो. त्याला माहीत आहे की मी नाही म्हणू शकत नाही. एकदा पैसे मिळाले की परत शिव्या देणं सुरू. या सगळ्या त्रासामुळे मला दारूचं व्यसन लागलं.” जसे काही समलिंगी पुरुष भिन्नलिंगी लैंगिक कल असलेल्या पुरुषाच्या प्रेमात पडतात आणि आज ना उद्या तो आपल्याला स्वीकारेल या आशेवर राहतात, तसंच काही वेळा काही भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या स्त्रिया समलिंगी पुरुषांच्या प्रेमात पडतात. त्या पुरुषानी जरी सांगितलं की 'मी समलिंगी आहे. मला तुझ्याबद्दल व इतर स्त्रियांबद्दल आकर्षण वाटत नाही', तरी अशा स्त्रिया हे मनावर घेत नाहीत. आज ना उद्या तो बदलेल या आशेवर त्या राहतात. काही स्त्रिया एखादा समलिंगी पुरुष आपल्यावर भाळत नाही हा स्वतःचा अपमान समजतात. आपण दिसायला सुंदर आहोत, कोणत्याही पुरुषाला आपण वश करू शकतो अशी त्यांची समजूत असते. अशा स्त्रियांसाठी समलिंगी पुरुष एक आव्हान ठरतं आणि त्या स्वतःचं हसं करून घेतात. जोडीदार भेटल्यावर, सुरुवातीला जरी खरी माहिती दिली नसली तरी हे नातं दीर्घ काळ जोपासायची इच्छा होईल तेव्हा जोडीदारांनी एकमेकांना संपूर्ण व खरी माहिती द्यावी. त्याचबरोबर दोघांची नीतिमूल्यं समान पातळीवरची आहेत का? हे जाणून घ्यावं. नीतिमूल्यं समान नसतील तर खूप ताण-तणाव निर्माण होऊ शकतो. अशी नाती जोपासण्यात ताकद पणाला लावायची [? याचा नीट विचार व्हावा. जर दोघंही वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे असतील तर धार्मिक, सांस्कृतिक पैलू वेगळे असल्यामुळे दोघंजण एकमेकांना ज्याचेत्याचे रीतीरिवाज पाळण्यास मुभा देणार का? आपल्या रीतीरिवाजात जोडीदारांनी सहभागी व्हावं असा हट्ट असणार का ? जोडीदाराची सहभागी व्हायची तयारी नसेल तर त्या नात्यात हा विषय किती वादास्पद होईल याचा विचार व्हावा. “माझा एक मुस्लिम जोडीदार होता. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. काही काळानंतर तो म्हणाला की, मी त्याची बायको आहे तर मी धर्मांतर केलं पाहिजे. मी स्पष्ट नाही म्हणून सांगितलं आणि नातं तोडून टाकलं. जो माणूस मला माझ्या धर्मासकट स्वीकारू शकत नाही अशा माणसाशी कसं नातं ठेवायचं?" इंद्रधनु... ९६