पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रतिक्रिया जसं समलिंगी मुलं / मुली स्वतःची लैंगिकता कळायला लागल्यावर कुबलर रॉसनी नमुद केलेले टप्पे अनुभवतात तसंच आपला मुलगा/मुलगी समलिंगी आहे हे कळल्यावर पालकसुद्धा असे टप्पे अनुभवतात. अनेकांना खूप दुःख होतं व त्यातून सावरायला वेळ लागतो. फार थोडे पालक आपल्या मुलाची लैंगिकता लगेच स्वीकारतात. काहीजण तर आयुष्यभर स्वीकारत नाहीत. काहीजण आशा ठेवतात की हे तात्पुरतं आकर्षण आहे व काही दिवसांनी ते आपोआप कमी होईल. काहीजण आपल्या मुला/ मुलीवर राग काढतात. या रागाच्या मागे बाहेर कुणाला कळलं तर घरच्यांचं नाव खराब होईल ही भीती असते. वडिलांना लोक आपल्या पुरुषार्थाबद्दल शंका घेतील ही काळजी असते. आईला नवरा व इतर लोक (विशेषतः नवरा) आपल्याला दोष देतील ही काळजी असते. रागाबरोबर अनेक वेळा समलैंगिकतेबद्दल तिरस्कारही असतो. आपल्याच वाट्याला असं मूल का आलं? आपण कोणतं पाप केलं? याला वाढवण्यात आमची काय चूक झाली? याचं पुढे कसं होणार! अशा विचारांनी नैराश्य येतं. शेवटी नाइलाजाने काही पालक आपल्या मुला/मुलीला स्वीकारतात. पूर्णपणे स्वीकारणारे पालक फार थोडे असतात. प्रत्येकाचे पालक कोणत्या संस्कृतीत वाढले आहेत, किती संवेदनशील, समजुतदार आहेत, यावर त्यांची प्रतिक्रिया अवलंबून असते. काही पालकांना ही कल्पना अजिबात सहन होत नाही. ते टोकाची भूमिका घेतात. मुलाला घराबाहेर काढतात. "माझ्या आई-वडिलांनी माझं एक प्रेमपत्र वाचलं. त्यांनी मला घराबाहेर काढलं. तू आम्हाला आणि आम्ही तुला मेलो आहोत असं म्हणाले.” अशा मुलांना घरच्या लोकांबद्दल खूप द्वेष असतो, की आपल्याला त्यांनी एका क्षणात दूर केलं. पण त्याच बरोबर त्यांनी स्वीकारावं म्हणून मन झुरतही असतं. सुरुवातीला मधूनमधून मन भरून येणं, चिडचिड होणं व नैराश्य येणं होतं. हळूहळू सवय होते. तरीपण बहुतेक जणांना घराची ओढ असते. मी आहे तसा मला स्वीकारावं असं वाटत असतं. काही पालक हा विषय परत काढत नाहीत. एका पातळीवर हे चांगलं असतं कारण मग लग्न करायची अपेक्षा बंद होते. पण दुसऱ्या पातळीवर इथे संवादही बंद होतो. इतरांनी बोलायचं पण आपण मात्र आपल्याबद्दल काही बोलायचं नाही यामुळे कोंडमारा होतो. हाही एक प्रकारचा अस्वीकारच आसतो. काहीजणांच्या घरच्यांची प्रतिक्रिया सौम्य असते. "माझ्या घरच्यांना काहीच वाटलं नाही. म्हणजे आईला थोडं वाईट वाटलं. 'तुझं कसं होणार ! म्हातारपणी तुझ्या इंद्रधनु ९२