पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बरोबर ठरला. वडिलांना अजूनही याचा त्रास होतो पण आई आता एकदम OK आहे.” "माझ्या अपेक्षेपेक्षा दोघांनी खूप त्रास करून घेतला. सदैव रडत बसायचे. मला वाटत होतं की त्यांना धक्का बसेल पण इतका जोराचा बसेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी जन्माला आल्याबरोबर मेलो का नाही हेच वाक्य सारखं मला ऐकवायचे. सुदैवाने माझ्या बॉयफ्रेंडने मला खूप साथ दिली. त्याच्या आईने त्याला स्वीकारल्यामुळे, त्याच्या आईचा मला खूप आधार मिळाला. " कधी सांगायचं हे तुमच्या घरचं वातावरण कसं आहे यावर अवलंबून असतं. काहीजण स्वतःची लैंगिकता स्वीकारली की, लगेच टप्प्याटप्प्याने 'आऊट' होतात. काहीजण जोवर लग्नाची वेळ येत नाही तोवर काहीच बोलत नाहीत. काहीजण स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर सांगतात. जर घरच्यांनी घराबाहेर काढलं तर स्वत:च्या पायावर उभं राहता येईल हा विचार यामागे असतो. "मला माझे सगळे मित्र सांगायचे की आता सांगू नकोस. शिक्षण होऊ दे, स्वतःच्या पायावर उभा रहा नि मग सांग. मग वाईटात वाईट तुला घरच्यांनी घराबाहेर काढलं तरी तुझं काही अडणार नाही. पण मी माझ्या घरच्यांना ओळखत होतो. त्यांना त्याचा त्रास होईल असं मला वाटलं नाही आणि तसंच झालं. मी कॉलेजमध्ये असतानाच सांगितलं. आता टीव्ही वर 'विल अॅण्ड ग्रेस' लागलं की मला ते आवर्जून सांगतात.” काहीजण पालकांसमोर बसून हा विषय काढतात. एका वेळी शक्यतो एकाच व्यक्तीला सांगतात. आई आणि वडील दोघांना एकाच वेळी सांगत नाहीत. कारण दोघंजण एक होऊन आपल्यावर तुटून पडतील व त्यांचा रोष आपल्याला झेलता येणार नाही ही भीती असते. काहीजण पत्र लिहून ही माहिती कळवतात. काळजी ही घ्यावी लागते की ते पत्र फक्त ज्याला द्यायचं त्या व्यक्तीकडेच पोहोचेल. काहीजण आपल्या भावाला / बहिणीला सांगतात आणि त्यांनाच आपल्या आईशी किंवा वडिलांशी बोलायचा आग्रह धरतात. विषयाला कशी सुरुवात करायची? काहीजण एवढंच सांगतात की 'मला लग्न करायचं नाही'. घरचे लोक कारण विचारतात तेव्हा आढेवेढे घेतात आणि मग 'मला मुली आवडत नाहीत' असं सांगतात. याच्यापुढे जाऊन 'मी समलिंगी आहे' असं सांगतात. एक जण म्हणाला, "मी असं सांगितलं, माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्याबद्दल आदर आहे, विश्वास आहे. याचा एक महत्त्वाचा भाग आहे की मी स्वत:शी, तुमच्याशी प्रामाणिक राहणं. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या लहान-मोठ्या सुखदुःखाच्या गोष्टी आपण एकमेकांपाशी बोलत आलो आहोत. तेवढ्याच प्रांजळपणे मला आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी 'गे' आहे. " इंद्रधनु... ९१