पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही आय.टी. (Information Technology) कंपन्यांचं धोरण उदारमतवादी असतं. एक HR मॅनेजर म्हणाले, “आम्हाला तुमच्या लैंगिकतेशी काहीही कर्तव्य नाही. तुझं काम व्यवस्थित असल्याशी आम्हाला मतलब." " . जागतिकीकरणामुळे आज अनेक पाश्चात्त्य लोक कामानिमित्त आपल्या देशात येऊ लागले आहेत. आपल्या देशातल्या अनेक जणांना परदेशी लोकांबरोबर काम करावं लागतं. त्यामुळे काही कंपन्या आपल्या कामगारांसाठी लैंगिकतेबद्दल संवेदनशीलतेच्या कार्यशाळा भरवतात. हे बदल स्वागतार्ह आहेत. पण काही कंपन्यांचं म्हणणं आहे की जोवर आयपीसी ३७७ बदलत नाही तोवर आम्हाला समलिंगी व्यक्तींसाठी काही करता येत नाही. [61] काही वेळा उघडपणे अन्याय होत नाही पण सूक्ष्म स्तरावर होऊ शकतो. किती जबाबदारीचं काम अशा व्यक्तीला द्यायचं? बढती द्यायची का? कधी? पगारवाढ किती द्यायची? याच्या/हिच्या हाताखाली कोणी काम करायचं? हा/ही कुणाला रिपोर्ट करणार? हे निर्णय घेण्यात सूक्ष्म स्वरूपात त्या व्यक्तीच्या लैंगिकतेचा विचार होऊ शकतो. जमीर कांबळे म्हणाले, "सगळे माझ्याशी चांगले वागतात. काहीच प्रॉब्लेम नाही. पण मागच्या वर्षी मी व माझे काही सहकारी बाहेरगावी गेलो होतो. तेव्हा प्रत्येक बेडरूममध्ये दोघं जण अशी बेडरूम शेअर केली. माझ्या बेडरूममध्ये कोणीच यायला तयार नव्हतं. मला स्वतंत्र खोली मिळाली. एक प्रकारे चांगलं झालं पण त्याचबरोबर आपल्याला वेगळं केल्याचं मनाला लागलं.” या अशा उघड आणि सूक्ष्म स्वरूपाच्या भेदभावामुळे उघडपणे समलिंगी असलेल्या व्यक्तींना आपण कितीही हुषार असलो, मनापासून काम करणारे असलो तरी आपल्या कामाची किंमत कमी राहणार असं वाटू लागतं व याचा महत्त्वाकांक्षेवर वाईट परिणाम होतो. व्यवसाय व्यवसायात आपली लैंगिकता सांगायची नेहमी गरज नसली तरी आपली लैंगिकता कळली तर काही विशिष्ट व्यवसाय बंद करायची वेळ येऊ शकते. एखादा समलिंगी पुरुष ब्युटीपार्लर चालवत असेल व तो समलिंगी आहे हे सगळ्यांना माहीत असेल तरी त्याच्या व्यवसायावर काही विपरीत परिणाम होणार नाही, पण काही व्यवसाय असे असतात की जिथे लैंगिकता लपवणं गरजेचं होऊ शकतं. "मी भटजी आहे. सत्यनारायणाची पूजा सांगतो, लग्न, मुंज लावतो. मी समलिंगी आहे हे उघडपणे सांगितलं तर वाट लागेल माझ्या व्यवसायाची." इंद्रधनु.