पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुलींना लग्नाचा प्रतिकार करणं जास्त मुश्किल होतं. 'वेडी-बिडी आहेस का? आजकाल दिवस आहेत का, बाईमाणसाने एकटं राहण्याचे? काही टेन्शन घेऊ नकोस, लग्न झालं की सगळं ठीक होईल. उलट आम्हाला विसरून जाशील.' अशा प्रतिक्रिया येतात. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून तिला कमी शिक्षण दिलं जातं. नोकरी करायचं उत्तेजन, त्यांची लग्नबाजारात किंमत वाढावी एवढ्यापुरतंच दिलं जातं, पण त्याचबरोबर फार पगाराची नोकरी नसलेली बरी, कारण नवरा मिळायला त्रास होतो, म्हणून तिने कमी जिद्द, हुशारी, आकांक्षा दाखवावी ही अपेक्षा असते. या सगळ्यामुळे तिला स्वतंत्र आयुष्य जगण्याची मुभा मिळणं आणखीनच कठीण असतं. या दडपणांव्यतिरिक्त, लग्न करण्यास इतरही कारणं असू शकतात. काही पुरुष भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या पुरुषावर प्रेम करतात आणि त्याच्या नजरेत आपण चांगलं असावं म्हणून त्याच्या आयुष्याचं अनुकरण करून स्त्रीशी लग्न करतात. काही पुरुषांची समलिंगी नाती असतात. त्या नात्यांतल्या एकानं स्त्रीशी लग्न केलं तर तो आपल्या समलिंगी जोडीदाराला स्त्रीशी लग्न करण्यासाठी गळ घालू शकतो. काही जण विचार करतात की, आपण कर्तव्य म्हणून आपल्या आई-वडिलांसाठी लग्न करायचं. स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवायचा. अर्थात ही स्वतःची फसवणूक असते आणि जोडीदाराचीही. समलिंगी मुला / मुलींना मनात जाणीव असते की, लग्न करून आपण आपल्या जोडीदाराची जाणूनबुजून फसवणूक करीत आहोत. हे जाणून सुद्धा समाजाला भिऊन लग्न करतात आणि आगीतून फुफाट्यात पडतात. "मला लग्न केलंच पाहिजे. इच्छा नसली तरी. पण मला माझ्यापेक्षा तिची (माझ्या गर्लफ्रेंडची) काळजी वाटते. तिला याचा खूप त्रास होतोय. मी लग्न करणं म्हणजे तिला मी नाकारलं असा अर्थ तिनं लावून घेतला आहे. ती स्वतःचं काही बरंवाईट करेल याची मला भीती वाटते.... मी माझ्याबद्दल विचारच करत नाही. मी स्वतःला बधिर करून घेतलं आहे.” घरच्यांना जरी समलिंगी व्यक्तीनी आपल्या लैंगिकतेबद्दल सांगितलं तरी काही जणांच्या घरची मंडळी म्हणतात की, 'तुझं काहीही असू देत. • लग्न केलंच पाहिजे. लग्न झालं की सर्व ठीक-ठाक होईल. एक मूल झालं की, सगळंच स्थिरावतं.' घरच्यांना आपला मुलगा किंवा मुलगी समलिंगी आहे या गोष्टीला सामोरं जाण्याची अजिबात तयारी नसते. (मी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी घेतलेल्या शिबिरांमध्ये 'समलिंगी लोकांनी भिन्नलिंगाच्या व्यक्तीशी लग्न करावं का?' असा प्रश्न विचारतो, तेव्हा अनेक इंद्रधनु... ८१.