पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामाजिक समस्या प्रत्येक समलिंगी व्यक्ती मागच्या सत्रात नमुद केलेल्या सगळ्या टप्प्यांतून जातेच असं नाही. काहीजण आयुष्यभर आपल्या लैंगिकतेकडे नकारात्मक दृष्टीनेच बघतात तर काहीजण कालांतराने आपल्या लैंगिकतेचा स्वीकार करतात. शिक्षण संपलं, नोकरी लागली की आपली लैंगिकता सामाजिक प्रश्न बनू लागते. आपली लैंगिकता कायम लपवून ठेवायची का? घरच्यांना सांगायचं का? लग्न (भिन्नलिंगाच्या व्यक्तीशी) करायचं का? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे असतात. यावर होणारे निर्णय आयुष्याचा पुढील प्रवास ठरवतात. हे कोणतेच निर्णय घेणं सोपं नसतं. या निर्णयामुळे संसार, अर्थार्जनाचे मार्ग या सगळयावर दूरगामी परिणाम होणार असतात. लग्न वयात आल्यावर लग्न करणं, हे आपल्या देशात क्रमप्राप्त आहे. मुलांचं शिक्षण किती झालंय, आर्थिकदृष्टया ते स्थिरस्थावर झाले आहेत का ? याचा कुठलाही विचार इथे केला जात नाही. अजूनही पालकांनी वधू-वर शोधण्यासाठी उंबरे झिजवण्याची पद्धत आहे. मुला/मुलींची बाजू अशी की जोडीदार मिळवणं हा आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. तो निर्णय घेण्यात सगळ्यांचा सहभाग असलेला बरा. उद्या काही अडचण आलीच तर, 'मी कुठे निवड केलीय, पालकांनी केली' असं म्हणून आपली जबाबदारी टाळता येते. लग्न झाल्यावर वर्षात पाळणा हलणं अपेक्षित असतं. पुरुषावर त्याचं पुरुषत्व सिद्ध करण्याबाबत दडपण असतं, तर स्त्रीला मुलगा देण्याबाबत दडपण असतं. या जोडप्याचं एक स्वतंत्र जीवन आहे आणि त्यांना त्यांच्या परीनं संसार करायचा अधिकार आहे, असं कोणी मानत नाही. अशा वातावरणात एका समलिंगी व्यक्तीला 'मला लग्न करायचं नाही', हे सांगणं खूप अवघड होतं. ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला लैंगिक आकर्षण, जिव्हाळा, आपुलकी नाही अशा व्यक्तीबरोबर आयुष्य कसं काढायचं? ही कल्पनाच अंगावर काटा आणते. मग लग्न टाळण्यासाठी वेगवेगळी कारणं सांगावी लागतात. 'आता नको, नोकरीचं काही निश्चित नाही', 'मला एकही मुलगी पसंत पडली नाही.' अशी सगळी कारणं सांगून जेवढं टाळता येईल तेवढं टाळलं जातं. ही युक्ती दोन-चार वर्ष चालते. हळूहळू घरचे वैतागायला लागतात. 'आम्ही आता थकलो', 'आम्ही गेल्यावर तुझं कोण बघणार!', अशी वाक्यं ऐकू येतात. इंद्रधनु ८०