पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समलिंगी व्यक्तीवर प्रेम करताना निखळपणे या नात्याचा अनुभव घेतात. अर्थात हे एका दिवसात घडत नाही. कळत नकळत जसजसा मनावरचा ताण कमी होतो तसतसं मानसिक दडपण कमी होतं आणि आयुष्याचे इतर रंग दिसायला लागतात. त्या रंगांकडे लक्ष जातं, त्यांचं सौंदर्य दिसायला लागतं. याचा अर्थ आपण कोण आहोत हे ते सगळ्यांना सांगतातच असं नाही. काहीजण कोणालाच सांगत नाहीत (आयुष्यभर 'क्लोजेट'मध्येच राहतात.) काहीजण फक्त आई-वडिलांना सांगतात. घरच्यांना सांगणं हा प्रामाणिकपणाचा भाग आहे असं मानतात. काहीजण आपलं भिन्नलिंगी लग्न होऊ नये म्हणून नाइलाजानेच घरच्यांना सांगतात तर काहीजण फक्त त्यांच्या जवळच्या समलिंगी मित्रमंडळींनाच सांगतात. आपल्या लैंगिकतेचा अभिमान (Out and Proud) आपली लैंगिकता स्वीकारण्याचा टप्पा गाठला की हळूहळू समाजव्यवस्थेकडे एका तटस्थ वृत्तीने बघण्याची दृष्टी येते. आपल्यावर झालेले संस्कार, समाजाची बंधनं, चालीरीती, धर्म, कायदा, वैद्यकीय दृष्टिकोन या सगळ्यांकडेच ती व्यक्ती एका चिकित्सक वृत्तीने बघायला लागते. समाजातील सोंग-ढोंगं, वैगुण्यं स्वच्छ दिसायला लागतात. आपण या दुटप्पी संस्कृतीचे बळी आहोत आणि आपणच नाही तर समाजातील इतर घटक (उदा. स्त्रिया, दलित इ.) याच संस्कृतीचे बळी आहेत हेही स्वच्छपणे दिसायला लागतं. आणि मग मनात विचारांचा अंकुर फुटतो की ज्या संस्कृतीने आपल्या आयुष्याचं वाटोळं केलं ती संस्कृती बदलायला पाहिजे. संस्कृती बदलायची म्हणजे भिन्नलिंगी लैंगिक कलाच्या लोकांचा द्वेष करून नाही तर त्यांना संवेदनशील बनवून त्यांच्यात लैंगिकतेबद्दल माणूसपण आणून. आणि हे सगळं करायचं असेल तर आपण कोण आहोत, आपल्यावर या संस्कृतीमुळे कळत नकळत कसा अन्याय झाला आहे हे समाजाच्या समोर मांडलं पाहिजे. आपल्याला काय क्लेश भोगावे लागले याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे आणि यासाठीच 'आउट' झालं पाहिजे असा विचार मनात येतो. समाजाला आपल्या लैंगिकतेविषयी अभिमानानं सांगणं गरजेचं बनतं. अभिमान हा शब्द महत्त्वाचा आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातून आपल्या लैंगिकतेला विरोध असूनसुद्धा, जो आपली लैंगिकता न लाजता, कुठल्याही कारणांमागे न दडता, कुठल्याही दबावाला न जुमानता सांगतो त्याच्यासाठी अभिमान हाच शब्द सार्थ आहे. O इंद्रधनु ७९ ...