पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाटायला लागतं. अपशब्द बोलले जातात. त्या मुला/मुलीला आपली शिव्याशाप खायचीच लायकी आहे असं वाटतं व त्याचं / तिचं मनोबल पूर्णपणे खचून जातं. या काळात जर एखाद्या भिन्नलिंगी कलाच्या व्यक्तीवर प्रेम जडलं तर प्रश्न अजून बिकट होतो. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती आयुष्याचा केंद्रबिंदू होते. "मला तो म्हणाला, 'ए, मी तुझ्यासारखा गांडू नाही.' मला ते खूप लागलं. वाटायला लागलं की, ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती जर आपल्याला, आपण आहोत तशी स्वीकारणार नसेल तर आपलं जिणं व्यर्थ आहे.” अशा एकतर्फी प्रेमात साहजिकच निराशा पदरी पडते. या अस्वीकारामुळे मुलं अजूनच नैराश्याच्या गर्तेत ओढली जातात. समाजासमोर मात्र भिन्नलिंगी असल्याचा मुखवटा सदैव धारण करावा लागतो. ही दोन आयुष्यं जगण्यात संपूर्ण शक्ती खर्च होते. मनावर कमालीचा ताण येतो. मन सारखं त्याच विषयाभोवती घिरट्या घालायला लागतं. मी असा एकटाच आहे का? इतरजण असतील तर ते कुठे आहेत? एखादा जरी भेटला तरी त्याच्याशी मोकळेपणानं बोलता येईल. त्यांची या विषयाकडे बघण्याची काय नजर आहे? माझ्यासारखेच प्रश्न त्याला पडतात का? कोणत्या मार्गाने माझ्यात बदल होईल? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालतात. सुटकेचे मार्ग शोधणं (Negotiation) काही जण मानसोपचारतज्ज्ञाकडे जातात तर काही जण अध्यात्माकडे वळतात. काही पुरुष स्त्रीबरोबर संभोग करावा असा विचार करतात. जर स्त्रीबरोबर आपल्याला संभोग करता आला तर मग आपल्याला लग्न करता येईल (आपल्याला ते आवडो वा न आवडो) असा विचार करतात. (या विचारात लग्न म्हणजे संभोग हीच धारणा असते. यात प्रेमाचा, आपुलकीचा अजिबात विचार केलेला नसतो.) फार थोडे जण समलिंगी लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या काउन्सेलरची मदत घेतात. काहीजण समलिंगी व्यक्तींचा शोध घेतात- इंटरनेटचा आधार घेऊन, अंदाजे खडा टाकून त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. या मुलां/ मुलींची स्थिती अत्यंत नाजूक असते. अशा स्थितीत काहीजण त्यांचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यांना मानसिक आधार द्यायचा सोडून त्यांच्या बरोबर संभोग करून त्यांना सोडून देतात. आपला वापर झाला आहे हे जाणवल्यावर अजूनच नैराश्य येतं. कशासाठी जगायचं? असं वाटायला लागतं. इंद्रधनु... ७७