पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अपल्याला समाज वाईट समजतो ही भावना मनात रुजायला लागते. या काळात मानसिक स्थिती अत्यंत नाजूक असते. आधाराची, आदर्श प्रतिमांची फार मोठी गरज असते. आई-वडिलांचा आधार असावा, आपल्याला आपल्या मित्रांनी स्वीकारावं व आपल्या सारख्या समलिंगी व्यक्तींच्या आदर्श प्रतिमा आपल्या समोर असाव्यात असं प्रकर्षाने वाटत असतं आणि हाच महत्त्वाचा आधार उपलब्ध नसतो. त्यामुळे आपलं वेगळेपण स्वीकारण्यास बहुतेकांची तयारी नसते. आपण समलिंगी आहोत याचा खूप क्लेश होतो. आपल्या लैंगिकतेच्या जाणिवेपासूनचा प्रवास खूप कष्टाचा असतो. आपली लैंगिकता मानण्यास नकार, राग, बदलण्याचे मार्ग शोधणं, नैराश्य, आपली लैंगिकता मान्य करणं, आपली लैंगिकता पूर्णपणे स्वीकारणं, आपल्या लैंगिकतेचा अभिमान बाळगणं हे या प्रवासाचे काही टप्पे. हे नमुद केलेले टप्पे 'कुबलर-रॉस’ मोजपट्टीच्या साहाय्याने खाली दिले आहेत. (मी या मोजपट्टीत शेवटी थोडा बदल केला आहे.) लैंगिकता मानण्यास नकार (Denial) काही समलिंगी पुरुष असा विचार करतात की, तारुण्यातली ही एक तात्पुरती अवस्था आहे. आज ना उद्या ही आवड आपोआप कमी होईल आणि आपल्याला मुलींबद्दल आकर्षण वाटू लागेल. पण दोन-तीन वर्षे गेली तरी आपल्याला मुलींबद्दल थोडंसुद्धा आकर्षण वाटत नाही हे कळतं आणि लक्षात येतं की ही तात्पूरती अवस्था नाही. “मी नट्यांना मनात आणून हस्तमैथुन करायचा प्रयत्न करायचो, एकदाही मला ते जमलं नाही. ती नटी निसटून जायची आणि एखादा चांगला दिसणारा नट समोर यायचा. काहीजण समलिंगी असूनसुद्धा आपण उभयलिंगी आहोत असं भासवतात. समलिंगी असण्याबद्दल मनात खूप द्वेष असल्यामुळे ते विचार करतात की, आपण उभयलिंगी आहोत असं सांगितलं तर समाजाच्या नजरेत आपण अर्धेच वाईट ठरू, पूर्ण वाईट ठरणार नाही. आपण उभयलिंगी आहोत अशी समजूत करून घेतली की, आपल्याला अपराधीपणाची भावना न बाळगता लग्नही करता येईल. “मला माहीत होतं की, मी समलिंगी आहे. तरी मी सुरवातीला सांगायचो की, मी बायसेक्शुअल आहे. स्वतःला बायसेक्शुअल म्हणवून घेण्यात फार कमीपणा वाटायचा नाही.” " काही समलिंगी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाबरोबर रिसेप्टिव्ह रोल घ्यायला आवडतो. प्रत्यक्षात लैंगिक संबंध झाले नसले तरी स्वप्नरंजनाच्या वेळी, हस्तमैथुनाच्या वेळी हाच सेक्स रोल मनामध्ये येतो. आपण पुरुष असून रिसेप्टिव्ह जोडीदार बनायची इच्छा ठेवतो याचा काहीजणांना खूप त्रास होतो, न्यूनगंड वाटतो. एक वेळ पुरुषाबरोबर इंद्रधनु ७५ ...