पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारखा प्रश्न पडायचा की या पुरुषांमध्ये असं आहे तरी काय? यांचा आत्मविश्वास, मयूरी कुठून येते? आपण सगळ्यात श्रेष्ठ, ही भावना त्यांच्यात कुठून येते? ते त्यांची गुपितं माझ्याइतकी व्यवस्थित लपवतात का? त्यांच्याकडे बघून त्यांना काही प्रश्न/ शंका आहेत असं वाटत तरी नाही. हे त्यांचं राजेशाही वागणं खूप लोभसवाणं वाटायचं आणि ते आपल्या नशिबी नाही म्हणून नशिबाला कोसायचो. एकीकडे पुरुष हवा आहे आणि त्याच बरोबर त्याच्यासारखं आयुष्य हवं आहे, अशी मनाची ओढाताण व्हायची. दोन्ही हाती लागत नाही म्हणून हळूहळू पुरुषांबद्दल द्वेष वाटायला लागला. म्हणजे स्त्रियांबद्दल मत्सर आणि पुरुषांबद्दल द्वेष आणि या दोघांच्या मध्ये मला कुठेही स्थान नाही. नैराश्य आलं. काही करायची इच्छाच उरली नाही. कशासाठी शिकायचं, नोकरी करायची हेच कळेना. मला माझ्या लैंगिकतेनी पूर्णपणे ग्रासून टाकलं. घरच्यांना कळलं तर त्यांना किती दु:ख होईल! त्यांनी मला इतक्या प्रेमाने वाढवलं आणि मी हा 'असा!' आत्महत्या करायचा विचार मनात यायचा. सगळ्या भावनांचा कोंडमारा व्हायचा. कुणाशी बोलता यायचं नाही. कुणाला माझं गुपित कळेल या नुसत्या विचारानं मूत निघेल असं वाटायचं. हळूहळू लग्नाचं वय आलं. मी परत एका भिन्नलिंगी मुलाच्या प्रेमात पडलो. त्याला माझी लैंगिकता माहीत नव्हती. तो 'होमोफोबिक' होता. पण त्यानं मला स्वीकारावं ही माझी तळमळीची इच्छा. आणि त्याने मला स्वीकारायचं असेल तर मी भिन्नलिंगी आहे असं दाखवणं माझ्यासाठी तेव्हा गरजेचं होतं. घरच्यांची अशी इच्छा असते की नोकरीत स्थिरस्थावर झाला की मुलाचे लग्न व्हावं. इतर काही नाही तरी कर्तव्य म्हणून लग्न करणं, मुलं होणं हे सर्व झालं पाहिजे अशी धारणा. या सगळ्याच्या विरोधात जायची माझ्यात ताकद नव्हती. मला आता या दुबळेपणाची लाज वाटते. चीड पण येते. त्यावेळीही यायची. पण कुठल्याही संस्कृतीचा विरोध करायचा तर, पहिलं पाऊल म्हणजे आपण आपल्याला स्वीकारायला हवं. माझा तोच पाया कुचका होता. समलिंगी असणं चूक आहे, ही भावना मनात होती. या सगळ्यात, लग्नाची आपली मानसिक तयारी, त्याच्या बरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या, प्रेमाचा पाया याचा मी काहीही विचार केला नाही. 'पुरुष' आणि 'स्त्री' च्या नात्याबद्दल कधी विचारच केला नाही. स्वतंत्र विचाराची सवयच नव्हती. शिकायचं असतं, एक चांगली नोकरी मिळवायची असते (बिझनेस नाही. नोकरी.), ती टिकवायची असते, एका वयात लग्न करायचं असतं, नुसतं लग्न नाही तर त्यानंतर एखादं मूल हवं (दोन मुलं असली तरी बरी. एकात एक खेळतं असा समज.. म्हणजे काय कोण इंद्रधनु ... ७