पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाणे!) लग्न झाल्यावर बायकोनं तिचं घर सोडून आपल्या घरी यायचं, तिचं आडनाव बदलायचं. या पद्धतीत ती एक व्यक्ती आहे, तिला काही भावना, अपेक्षा, आकांक्षा आहेत याचा अजिबात विचार केला नाही. या ढाच्यात काही चुका, वैगुण्यं आहेत का? असा कधी प्रश्न पडला नाही. माझी सगळी मानसिक ताकद 'मी भिन्नलिंगी आहे', हे भासविण्यात खर्च व्हायची. दुसऱ्या इतर गोष्टींना स्थानच नव्हतं. माझा पुरुषार्थ जपण्यासाठी मी कोणाचंही प्यादं बनवायला तयार होतो... नाहीतर जीव द्यायला तयार होतो. माझं लग्न झालं आणि वर्षानं घटस्फोट झाला. (तेव्हा मी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे एचवनबी (H1B) व्हिसावर अमेरिकेत नोकरी करत होतो.) खूप मनस्ताप झाला आणि आधारासाठी मी सॅन फ्रेंन्सिस्कोमध्ये असलेल्या एका भारतीय समलिंगी सपोर्ट ग्रुपकडे (त्रिकोण) मदत मागितली. त्यांना भेटायचं मनात खूप दडपण होतं- तिहाईत माणसासमोर गेल्याबरोबर ते मला ओळखणार की मी 'तसा' आहे. प्रचंड शरम वाटत होती आणि..... आणि पहिल्या भेटीत जादूची कांडी फिरवावी तसं माझं विश्वच बदललं. माझ्यासारखे अनेक पुरुष आहेत. माझ्यासारखे अनेकांचे अनुभव आहेत. मीच एकटा काही जगात 'असा' नाही, हे कळलं. इतरांना (विशेषत: आई-वडिलांना) कसं सांगायचं हा प्रश्न असला तरी मला माझ्याबद्दल जो तिरस्कार होता तो एका क्षणात गळून गेला. माझ्या लैंगिकतेत लपवण्याजोगं काय आहे? असं वाटायला लागलं. आणि त्या दिवसापासून माझा पुढचा रस्ता स्वच्छपणे दिसायला लागला. हळूहळू मला मी 'गे' आहे याचा अभिमान वाटायला लागला. त्या दिवसापासून माझी दृष्टी बदलली. हे दडपण कमी झाल्याबरोबर प्रत्येक गोष्ट मला वेगळ्या रंगात दिसायला लागली. 'त्रिकोण'च्या सपोर्ट ग्रुपमध्ये मला समलिंगी, उभयलिंगी पुरुष व स्त्रिया भेटल्या. सुरूवातीला मी तिथे येणाऱ्या मुलीवर जरा (जरा नाही बराच) नाखूषच होतो. “त्रिकोण'ची जागा फक्त पुरुषांसाठीच असावी असं वाटायचं. या बाया' नाही आल्या तर बरं होईल, असं वाटायचं. त्याचबरोबर ज्या मुली खूप अंग्रेसिव्ह होत्या, त्यांच्याबरोबर संवाद साधायला अवघड वाटायचं, अस्वस्थ वाटायचं. मुली अंग्रेसिव्ह असू शकतात ही सवयच नव्हती. पुरुषांनी अंग्रेसिव्ह असलं पाहिजे पण बायकांनी असू नये, ही माझी धारणा होती. हळूहळू जसा माझा न्यूनगंड कमी होत गेला तसा मी त्यांना स्वीकारायला लागलो. त्यांचे प्रश्न कळायला लागले. लेस्बियन मुलींना काय अडचणी येतात हे कळायला लागलं. मुलींना पुरुषांइतकं स्वातंत्र्य नाही, पुरुषांइतक्या शिक्षणाच्या, नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत, एकटीने इंद्रधनु ८