पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सेक्सबद्दलचं अर्धवट आणि काही अंशी चुकीचं ज्ञान कादंबऱ्यांतून, मित्रांच्या सेक्सबद्दलच्या बोलण्यातून व मुतारीतली चित्रं बघून हळूहळू मिळायला लागलं. जे कळायचं ते घाण वाटायचं. या पार्श्वभूमीवर मला पहिल्यांदा जेव्हा सातवीत वीर्यपतन झालं तेव्हा तो अनुभव अनपेक्षित होता व घाबरवणारा होता. मला आजार झालाय का? कुणाला विचारू? ही माझ्या मनाची अवस्था. वर्गात मुलं अर्धनग्र स्त्रियांची चित्रं असलेली मासिकं आणायला लागली होती. ती मधल्या सुट्टीत शाळेच्या मागे जाऊन बघायची. मला कधीच मुलींबद्दल आकर्षण वाटायचं नाही. पण असं सांगितलं असतं तर माझं लगेच 'रॅगिंग' झालं असतं. त्यामुळे बोलून दाखवणं परवडण्यासारखं नव्हतं. वर्गात एक मुलगा मला खूप आवडायचा. त्याच्याशी संभोग करायचा विचार मनात येऊ लागला. पण तोही मी कधी कुणाशी बोलून दाखवला नाही. त्याला मनात आणून मी हस्तमैथुन करायचो. तेव्हा 'समलिंगी' शब्द माहीत नव्हता. फक्त भावना आणि शारीरिक इच्छा कळत होत्या. मला कधीही मुलींबद्दल प्रेम, लैंगिक आकर्षण वाटलं नाही. माझ्या मित्रांना पुरुषांबद्दल लैंगिक जवळीक वाटत नाही, हे जाणवलं व मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे कळायला लागलं. याचा मला मानसिक त्रास व्हायला लागला. मीच का असा? मी काय पाप केलंय? आपण इतरांसारखे नाही आहोत, ही भावना मनात रुजली आणि हळूहळू स्वभाव एकलकोंडा बनत गेला. एकाही मुलीशी माझी मैत्री झाली नाही. मला काही समलिंगी पुरुष सांगतात की त्यांना खूप मैत्रिणी आहेत कारण, 'मुली आपल्याला जास्त स्वीकारतात.' पण माझं का कोण जाणे तसं झालं नाही. अवती-भवती मुलंच असावीत, जगात एकही मुलगी नसली तर चांगलंच अशी भावना मनात यायची. जाणवायला लागलं की जो मुलगा मला आवडतो त्याला मी न आवडता दुसरी मुलगी आवडते. त्यामुळे मुली मला स्पर्धक वाटायला लागल्या. या शर्यतीत मी कितीही मनापासून एखाद्या मुलावर प्रेम केलं तरी माझ्या वाट्याला अपयशच येणार असा न्यूनगंड माझ्यामध्ये निर्माण झाला. आपण सदैव सगळ्यांतच कमी पडणार, इतर पुरुषांच्या तुलनेत आपण कायम मागे राहणार असं वाटायला लागलं. कुठलीही महत्त्वाकांक्षा उरली नाही. दोन भिन्नलिंगी पुरुषांवर एकतर्फी प्रेम केलं, त्यात साहजिकच निराशा पदरी पडली. या अस्वीकारानी मी अजूनच खचून गेलो. मी वरवर भिन्नलिंगी असल्याचं नाटक करायचो- भिन्नलिंगी मुखवटा घालायचो. माझ्या मित्रांना माझं खरं रूप कळलं तर ते मला सोडून जातील ही भीती कायम मनात असायची. इंद्रधनु ६