पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गेल्या चार-पाच वर्षांपासून टीव्हीवर समलैंगिकता या विषयावर चर्चा व्हायला लागल्या आहेत. या चर्चा बघताना काही अडचणी जाणवल्या- जर कार्यक्रमाचा संयोजक समलिंगोद्वेष्टा असेल तर तो ती चर्चा त्याच्या सोयीने वळवण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातूनच प्रश्न विचारणं, समलिंगी कार्यकर्ते मत मांडत असताना मध्येच त्यांचं मत तोडणं इ. दुसरी अडचण अशी जाणवते की काही ठरलेले पाच-सात समलिंगी पुरुषच अशा चर्चेत भाग घ्यायची तयारी दाखवतात. इतरजण पुढे येत नाहीत. विशेषतः लेस्बियन्स 'मी मराठी' दूरदर्शन वाहिनीवर 'दिलखुलास'च्या एका चर्चेत मी भाग घेतला होता. विषय होता 'समलैंगिकता योग्य की अयोग्य?' ही चर्चा समलिंगी पुरुषांवर आधारलेली होती. तो शो रेकॉर्ड झाला. त्यावेळी संयोजकांना वाटलं की, अजून एक शो लेस्बियन्स्वर रेकॉर्ड करावा. पण खूप प्रयत्न करून, लेस्बियन्स्बरोबर काम करणाऱ्या काही संस्थांशी संपर्क साधून सुद्धा एकही लेस्बियन या कार्यक्रमासाठी उपलब्ध होऊ शकली नाही. सिनेमा काही सिनेमे समलैंगिकता हा विषय थट्टा, विनोद करण्यासाठी वापरतात. तर काही सिनेमे हा विषय सनसनाटी निर्माण करण्यासाठी वापरतात. या विषयाशी निगडित संवेदनशील पात्र असलेले सिनेमे फार थोडे (उदा. हिंदी सिनेमे - 'सेवन रूल्स : प्यार का सुपरहिट फॉरम्यूला', 'हनिमून ट्रॅव्हलस्' इ.). फार थोडे सिनेमे हा विषय संवेदनशीलपणे हाताळतात- 'बॉमगे' (BOMBgAY ) (डॉ. राज राव यांच्या कवितांवर आधारित रियाध वाडीयांनी काढलेली शॉर्ट फिल्म ), 'मँगो सुफले' (दिग्दर्शक: महेश दत्तानी), 'गुलाबी आयना' (दिग्दर्शक: श्रीधर रंगायन), 'माय ब्रदर निखिल' (दिग्दर्शक: ओनीर), 'थांग' (English Version - The Quest' ) (दिग्दर्शक: अमोल पालेकर), 'अडसट पत्रे' (दिग्दर्शक: श्रीधर रंगायन). मराठी सिनेमा 'उंबरठा' मध्ये दोन स्त्रियांच्या लैंगिक संबंधाचा एक प्रसंग दाखवला आहे. मराठीत समलिंगी विषय प्रामुख्याने हाताळणारा एकच सिनेमा आतापर्यंत निघाला आहे, 'थांग'. या सिनेमात समलिंगी संबंधांना मान्यता दिली पाहिजे हे अगदी स्पष्टपणे मांडलं आहे. संध्या गोखले (पटकथाकार 'थांग') म्हणाल्या, “ हा विषय मांडण्यासाठी मी पटकथेची स्त्रीकेंद्रित रचना केली. तिच्याबरोबर प्रेक्षकांनी चित्रपटभर राहणं आणि तिच्याबरोबर समलैंगिकतेचा प्रश्न समजून घेणं हे महत्त्वाचं होतं. नाहीतर प्रेक्षक सिनेमात गुंतला नसता आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत तटस्थ राहिला असता. आपल्या उंबऱ्यावर हा प्रश्न आल्यावर, जो क्लेश होतो आणि हळूहळू त्यातून सावरून इंद्रधनु ... ६९