पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९५० च्या उत्तरार्धात या चळवळीला एव्हलीन हुकर यांच्या संशोधनाचा फायदा झाला. सायकॉलॉजिस्ट एव्हलीन हुकरला तिच्या माहितीच्या एका समलिंगी जोडप्यानी विनंती केली की तिला त्यांच्या जीवनशैलीकडे बघून ते आजारी आहेत असं वाटत नसेल तर तिने या विषयावर संशोधन करावं व त्या अभ्यासाचे निष्कर्ष सगळ्यांसमोर मांडावे. या विनंती वरून तिने पुढाकार घेऊन काही भिन्नलिंगी आणि समलिंगी व्यक्तींच्या चाचण्या घेतल्या. या चाचण्यांतून भिन्नलिंगी व समलिंगी व्यक्तींच्या मानसिक स्वास्थ्यात काही वेगळेपण आढळून येतं का? हे शोधायचा प्रयत्न केला. त्या संशोधनातून तिने मानसशास्त्रज्ज्ञांना दाखवून दिलं की, त्यांच्या चाचण्या जर निकोप दृष्टीने वापरल्या तर समलिंगी व्यक्ती मानसिकदृष्टया आजारी आहे हे सिद्ध होत नाही [53]. या अहवालामुळे समलिंगी कार्यकर्त्यांना अजून बळ आलं. अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिओशनच्या संमेलनात निदर्शनं होऊ लागली. एका संमेलनात एक मानसोपचारतज्ज्ञ वेशभूषा बदलून आले व सगळ्यांसमोर म्हणाले की, ते समलिंगी आहेत, व त्यांना व त्यांच्या सारख्या अनेक मानसोपचारतज्ज्ञांना त्यांचा लैंगिक कल व समलिंगी नाती व्यावसायिक मान्यतेपायी लपवून ठेवावी लागत आहेत. स्टोनवॉलची दंगल १९६० च्या दशकात न्यूयॉर्कमध्ये काही बार्समध्ये समलिंगी लोक जमा होत. या बार्सवर पोलिस धाड टाकत व समलिंगी लोकांना त्रास देत. २८ जून १९६९ मध्ये 'स्टोनवॉल इन' वर पोलिस धाड घालायला आले तेव्हा उत्स्फूर्तपणे समलिंगी लोकांनी विरोध केला. दंगल उसळली. याला स्टोनवॉलची दंगल म्हणतात. तेव्हापासून अमेरिकेत समलिंगी हक्कांसाठी चालविलेल्या चळवळीला खूप जोर आला. काही मानसोपचारतज्ज्ञ उघडपणे म्हणू लागले की, समलैंगिकता हा आजार नाही. तर काही जणांचं मत होतं की हा आजार आहे. या विषयावर कडाक्याचे वाद सुरू झाले व शेवटी १९७३ साली अमेरिकन सायकिअॅट्रिस्ट असोसिओशनने समलैंगिकता आजाराच्या यादीतून काढून टाकली (Diagnostic & Statistics Manual III-R). अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिओशनने १९७६ साली समलिंगी असणं हा आजार नाही हे घोषित केलं. त्यांचा या विषयावरचा ठराव संक्षिप्त स्वरूपात देत आहे [54] - 'निर्णयक्षमता, स्थिरवृत्ती, विश्वासार्हता किंवा सर्वसाधारण सामाजिक आणि धंदा-व्यवसायातली कार्यकुशलता या सायात समलिंगी प्रवृत्तीमुळे मुळात बाधा येत नाही. इंद्रधनु... ६१