पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोगत मी पुण्याचा. पुण्यात माझा जन्म झाला. माझं बालपण, शिक्षण सगळं पुण्यात झालं. मला एक धाकटी बहीण. आई-वडील दोघंही शिकलेले. वडील सरकारी ऑफिसात शास्त्रज्ञ होते. एकट्या वडिलांच्या पगारावर संसार चालवणं अवघड झालं म्हणून आईने बी.एड. केलं व शिक्षिका झाली. घरचं वातावरण धार्मिक होतं. घरी सत्यनारायणाची पूजा, तुळशीचं लग्न, महाशिवरात्री, हरतालिका पूजा हे सगळं व्हायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाणं म्हणजे तीर्थक्षेत्राला जाणं- ह्या वेळी शेवगाव तर पुढच्या वेळी पंढरपूर, तुळजापूर. घरची माणसं अंधश्रद्धाळू होती. शनिवारी तेल विकत आणायचं नाही, केस कापायला जायचं नाही, नवीन कपड्यांना पाणी लावल्याशिवाय ते अंगावर घालायचे नाहीत इत्यादी. आम्ही हे नियम मोडलेले घरच्यांना आवडायचं नाही. घरच्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी जवळीक साधली नाही. कोणत्याही चळवळीत कधी भाग घेतला नाही. वर्तमानपत्रातील बातमी, लेख वाचून घरात मतप्रदर्शन व्हायचं तेवढंच. थोडक्यात सगळ्या समाजाला, देवाधर्माला घाबरून, रूढी, रीती-रिवाज पाळून राहणारं एक टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब! लैंगिक विषयावर घरात कधीही बोललं जायचं नाही. मला आठवतंय- लहान असताना एकदा बहिणीने आईला विचारलं 'मुलं कशी होतात?' आई म्हणाली, 'पोटातून येतात.' मला हे उत्तर पूर्णपणे समाधानकारक वाटलं. पण बहीण जास्ती चौकस. बहीण : पोटातून येतात म्हणजे कुठून येतात? आई : पोट फाटून येतात. बहीण : तुझं पोट कुठं फाटलंय? आई : मग ते आपोआप बंद होतं. बहीण : असं कसं बंद होतं? तेव्हा आईनं काय उत्तर दिलं हे मला आठवत नाही. काहीतरी टोलवाटोलवी केली असणार. हे असं सगळं असलं तरी काही बाबतीत घरचे उदारमतवादी होते. काहीही वाचायला कधी विरोध झाला नाही. मी सहावीत हॅरॉल्ड रॉबिन्सची पुस्तकं वाचायला लागलो. पण 'हॉट' पुस्तकं जरी वाचली तरी मला लैंगिक माहिती मिळाली नाही. आपण काय वाचतो याचा अर्थ कळायचा नाही. इंद्रधनु ... ५