पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकोणीसावं शतक एकोणीसाव्या शतकात काही मानसोपचारतज्ज्ञ समलैंगिकतेच्या केसेस प्रसिद्ध करू लागले. समलिंगी आकर्षणामागच्या जडणघडणीच्या कारणांचा विचार करू लागले (त्याकाळात लैंगिक कल व लिंगभाव (Gender Identity) अशी दोन विभाजनं झाली नव्हती). या विषयावर नवा प्रकाशझोत टाकणारे कार्ल हेन्रीच उलरीच (१८२५- १८९५) हे जर्मन ज्युरिस्ट होते. ते स्वतः समलिंगी होते. समलिंगी होण्याला कारणीभूत मूल गर्भात असताना वेगळी जडणघडण होत असेल अशी त्यांची धारणा होती. अशा लोकांना समाजात मान्यता मिळाली पाहिजे आणि त्यांची लैंगिकता समाजाने स्वीकारली पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती. ऑस्ट्रियाचे डॉ. रिचर्ड फ्रायहर फॉन क्रॅफ्ट एबिंग (१८४० - १९०२) यांनी विविध लैंगिक पैलूंचा अभ्यास करून 'सायकोपॅथिया सेक्शुअॅलिस' हा ग्रंथ लिहिला. समलिंगी आकर्षण ही विकृती आहे असं त्यांचं मत होतं. [51] ब्रिटिश डॉ. हॅवलॉक एलिस (१८५९ - १९३९) यांनी लैंगिकतेवर अभ्यास करून ‘स्टडीज् इन द सायकॉलॉजी ऑफ सेक्स' चे खंड लिहिले. त्यातला दुसरा खंड हा समलैंगिकतेवर आधारित आहे. त्यांचा समलैंगितेकडे बघण्याचा दृष्टिकोन काही अंशी सहिष्णु होता, अशा व्यक्ती विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करू शकतात व त्यांना तसं करण्यास उत्तेजन दिलं पाहिजे, समलिंगी संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा बदलला पाहिजे अशा मताचे ते होते. [52] डॉ. मॅग्लस हर्चफेल्ड ( १८६८-१९३५) यांनी १८९७ साली बर्लिनमध्ये जगातील पहिली समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी झटणारी संस्था 'Wissenchaftlich- humanitares' (Scientific-humanitarian Committee) स्थापन केली. १९१९ साली त्यांनी जगातील पहिली लैंगिकतेवर संशोधन करणारी संस्था 'Institute fur Sexualwissenschaft' स्थापन केली. ते स्वतः समलिंगी होते. समलैंगिकता हा आजार आहे अशी त्यांची धारणा होती पण समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारं (जर्मन दंडविधान संहितेचं) १७५ कलम बदलावं यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. पण त्यांना यश आलं नाही. या काळात ॲडॉल्फ हिटलरची सत्ता वाढत होती. समलिंगी लोकांची कीड आपल्या सर्वश्रेष्ठ आर्यन समाजास घातक आहे, ती लवकरात लवकर काढून टाकली पाहिजे ही धारणा नाझी जनतेत वाढायला लागली होती. समलिंगी लोकांवरचे अत्याचार वाढायला लागले. १९३३ साली 'Institute for Sexual wissenschaft' संस्था जाळण्यात आली. १९३५ साली नीसमध्ये डॉ. इंद्रधनु... ५९