पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हादीथ हादीथ अनेकजणांनी लिहिली आहेत. सगळ्याच हादीथमधले प्रत्येक समलिंगी संभोगासंबंधीचे उतारे इथे देणं शक्य नाही. उदाहरणादाखल ‘सूनन अबू दाउद' हादीथमधले काही उल्लेख खाली दिले आहेत. [23] ३८ : ४४४७ अब्दुलला इब्न-अब्बास यांनी सांगितले की, प्रेषित म्हणाले, लॉटच्या लोकांनी वर्तन केले तसे वर्तन करताना तू कोणाला बघितले तर जो करणारा आहे त्याला ठार मारावं व ज्याला केलं जातंय त्यालाही ठार मारावं. ३८ : ४४४८ अब्दुलला इब्न-अब्बास यांनी सांगितले की, जर एखादी लग्न न झालेली व्यक्ती गुदमैथुन करताना नजरेस आली तर त्याला दगडाने ठेचून मारलं जाईल. धार्मिक वातावरणाचा परिणाम जी समलिंगी मुलं/मुली धार्मिक वातावरणात वाढतात त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. समलिंगी प्रेमाचा विचार करणं, ते प्रेम व्यक्त करणं, समलिंगी संभोग करणं हे परमेश्वराच्या आदेशाचा भंग करणं आहे, या विचारसरणीमुळे आपण पापी आहोत, वाईट आहोत अशी त्यांची धारणा बनते. एकदा का हा न्यूनगंड निर्माण झाला की आपण शिक्षेस पात्र आहोत असं वाटू लागतं. त्यामुळे जो काही (कुठल्याही कारणांनी) आपल्याला त्रास होईल, अन्याय होईल तो आपण चुपचाप स्वीकारला पाहिजे कारण आपली तीच लायकी आहे अशी विचारधारा बनते. एकदा का या स्वद्वेषाच्या गर्तेत अडकलं, की बाहेर पडणं खूप अवघड होतं, तो कोंडमारा असह्य होतो. “माझ्या घरच्यांना माहीत नाही की मी समलिंगी आहे. आम्ही खूप धार्मिक आहोत. माझं मन मला दोन्हीकडे ओढतं. मला माझा बॉयफ्रेन्डही हवा आहे आणि माझं देवावरही खूप प्रेम आहे. काय करू ते मला कळत नाही. हे पाप आहे ना?" काहींच्या घरचे आपल्या मुलावर करणी झाली आहे असा समज करून घेतात तर काही जणं समलैंगिकता हे गेल्या जन्माच्या पापाचं प्रायश्चित्त आहे असं समजतात. 'ही विकृती आहे, माझ्या मागच्या जन्मीचं पाप माझ्या उदरी तुझ्या रूपानं आलं आहे.' किंवा 'मागच्या जन्मी तू खूप मोठी पापं केलीस म्हणून तुला असा जन्म मिळाला.' अशी वाक्यं अनेकांच्या वाट्याला येतात. घरचे-दारचे लोक 'देवाधर्माचं कर म्हणजे हे विचार कमी होतील' असा सल्ला देतात. वेगवेगळे होमहवन करून, उपवास, नवस करून, गंडे-दोरे घालून हे कर्म शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. याने अर्थातच काहीही फरक पडत नाही. इंद्रधनु ३०