पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याच्या उलट आपल्याला काहीही कारण नसताना समाजाकडून एवढा त्रास सहन करावा लागतो त्याअर्थी आपण अध्यात्मात इतरांपेक्षा पुढे आहोत का? अशी काहींना शंका येते. “चारचौघांसारखेच आपण आहोत. मग एवढा त्रास, कुचंबणा आपल्याच वाट्याला का येते? एवढ्याशा क्षुल्लक गोष्टीचा समाजाला एवढा त्रास का व्हावा? याचं काय कारण असेल? एवढी घुसमट आपल्या वाट्याला येते तर आपण कदाचित देवाच्या जास्त जवळचे असू शकू का? म्हणूनच तो आपली एवढी कठीण परीक्षा घेतो आहे?" (असे तर्क लावणं माझ्या चौकटीत बसत नाही पण त्यांना असं वाटणं साहजिक आहे, एवढं मी नक्की समजू शकतो. एकेकाळी कॉलेजमध्ये असताना देवासमोर रडून रडून ‘मला बदल' म्हणून मीही त्याला साकडं घातलं होतं, हे मी कसं विसरू शकेन?) काहीही कारण नसताना आपल्याला समाज का स्वीकारत नाही हेच कळत नाही आणि मग ह्या होणाऱ्या हालअपेष्टांमागे त्या जगनियंत्याची वेगळी कृपादृष्टी आपल्यावर असली पाहिजे असा विचार वारंवार मनात येऊ लागतो. आपल्या वाट्याला या आयुष्यात दु:खाशिवाय काहीही येणार नाही हे टोकाचं नैराश्य आल्याशिवाय, एवढ्या टोकाचं स्वप्नरंजन लोक करत नाहीत. आपण अध्यात्मात स्वत:ला वाहून घेऊ, आपलं पापक्षालन करू, या इच्छांपासून मुक्त व्हायला बघू असा विचार करून काही समलिंगी व्यक्ती संन्यास घेतात. मग अशा व्यक्ती हे महाराज, ते महाराज, हा मठ, तो मठ असं भटकत मोक्षाची वाट शोधतात. काहीजण आपण समाजकार्य करून आयुष्य सत्कारणी लावू असा विचार करतात आणि समाजकार्यात उतरतात. अशोक राव कवी (संचालक: हमसफर ट्रस्ट) म्हणाले, “मी अध्यात्म शिकण्यासाठी रामकृष्ण मठात दाखल झालो. मला संन्यासी व्हायचं होतं. तिथं मी समलिंगी आहे हे कळल्यावर मला स्वामी हर्षानंदांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले 'समलिंगी असणं हे नैसर्गिक आहे. तू समलिंगी आहेस. तर तू स्वत:ला स्वीकार. त्याचा अव्हेर करू नकोस.' असं मोलाचं मार्गदर्शन करणारे फार थोडे असतात. सावलीसारखा लैंगिक कल आपल्याबरोबर असणारच. तो दाबून टाकावा, काढून टाकावा, बदलावा, असा कोणताही उपचार स्वत:वर करणं, करवून घेणं म्हणजे स्वत:वर अन्याय करणं आहे. जोवर शरीर आहे तोवर त्याच्या गरजा असणारच. शरीराला जसं पाणी आणि जेवण लागतं तसंच त्याला शरीरसुखही लागतं आणि ते त्या व्यक्तीच्या लैंगिक कलावर अवलंबून असतं. संन्यास घेतला तरी शरीराची गरज संपत नाही. ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर असते. " इंद्रधनु