पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, पुस्तकाविषयी थोडंसं पुस्तकाच्या पहिल्या भागात समलिंगी विषयावरचे विविध दृष्टिकोन मांडले आहेत. (एक पैलू मी मुद्दामच मांडला नाही, तो म्हणजे 'लोक समलिंगी का होतात?' यावर चाललेलं संशोधन. याचं एकच कारण आहे की यातलं बहुतेक सर्व संशोधन हे अत्यंत पूर्वग्रहदूषित आहे. समलिंगी असणं विकृती आहे आणि त्याचं कारण शोधून ती समूळ नष्ट करता आली पाहिजे या दृष्टीतून हे संशोधन केलेलं आहे. या असल्या अमानुष संशोधनाला या पुस्तकात थारा दिलेला नाही). दुसरा भाग हा समलिंगी जीवनशैलीबद्दल बोलतो- त्यांचं भावविश्व, त्यांच्या अडचणी, त्यांचे अधिकार इ. मला अनेकांनी पुस्तकासाठी मुलाखती दिल्या आहेत. काही जणांचे मुद्दे मांडले आहेत, तर काही जणांचे 'quotes' मी वापरले आहेत. (सगळ्यांचे ‘quotes' वापरणं शक्य नव्हतं. तसंच काही वेळा 'quotes' संपादित करून संक्षिप्त ठेवावे लागले.) काहीजणांना आपलं नाव पुस्तकात येऊ नये असं वाटत होतं. या गोष्टींचा विचार करून काही मतं नावानिशी आहेत तर काही मतं नावं वगळून प्रसिद्ध करीत आहे. मी प्रयत्न करून सुद्धा मला फार थोड्या लेस्बियन मुलींनी मुलाखती दिल्या. त्यामुळे त्यांचे अनुभव मी कमी प्रमाणात मांडू शकलो याची मला जाणीव आहे. पुस्तकात सरळ, सोपी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे. काही इंग्रजी शब्दांना मराठीत शब्द नाहीत. उदा. 'आऊट', 'क्लोजेट' इत्यादी. या इंग्रजी शब्दांची यादी व त्यांचा अर्थ मी सूचीत नमूद केला आहे. पुस्तकाचा विषय समजायला अवघड आहे, पचायला त्याहून अवघड आहे याचा मी अनुभव घेतला आहे, घेतो आहे. या पुस्तकाचा समाजात समलिंगी लोकांबद्दल संवेदनशीलता निर्माण होण्यास उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. तरीही हे पुस्तक माझीच गरज आहे, याचे भान मला आहे. बिंदुमाधव खिरे , 0 O इंद्रधनु ... ११