पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भेटलो. (आम्ही सगळे प्रेमाने यांना 'अम्मा' नावाने हाक मारतो.) त्यांनी मला संस्था सुरू करण्यासाठी खूप उत्तेजन दिलं. आणि मग सप्टेंबर, २००२ साली मी समलिंगी लोकांसाठी 'समपथिक ट्रस्ट' ही संस्था पुण्यात सुरू केली. संस्थेचं नुसतं 'गे सपोर्ट ग्रुप' एवढंच कार्य न ठेवता लैंगिकता/लैंगिक शिक्षण देणं, एसटीडी/एचआयव्ही/ एड्सवर हेल्पलाईन चालवणं, काउन्सेलिंग, समलैंगिकतेबद्दल लोकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणं हे ही कार्य सुरू केलं. ट्रस्ट सुरू केल्यावर लैंगिकतेचे इतर पैलू समजायला लागले. उदा. ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स इ. यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल हळूहळू समज यायला लागली. यांना जर कोणी स्वीकारलं नाही, जर यांना शिकायची, नोकरीची संधी मिळाली नाही तर यांनी काय करायचं? असे सगळे लैंगिक अल्पसंख्याक (LGBT and Intersex) पुरुषत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या सगळ्या कल्पना मोडणारे आहेत. आणि म्हणून ते कोणालाच नको आहेत. पुरुषांना नको आहेत कारण त्यांच्या पुरुषार्थाच्या कल्पनेला तडा जातो. स्त्रियांना नको आहेत, कारण त्यांना असुरक्षित वाटतं. म्हणून अनेक लोकांना (अगदी काही फेमिनिस्ट बायकानांसुद्धा) हे लोक नको असतात. कारण त्यांना सहजपणे स्त्रीविरुद्ध पुरुष अशी स्पष्ट भूमिका घेता येत नाही. पुस्तकाची गरज संस्था चालवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की समलिंगी विषयावर मराठीत फारसं काही लिखाण नाही. म्हणून मी समलिंगी विषयावर 'पार्टनर' नावाचं एक मराठी पुस्तक लिहिलं. एका समलिंगी मुलाची डायरी अशी या पुस्तकाची रचना होती. हे पुस्तक मुख्यतः समलिंगी व्यक्तींसाठी लिहिलं होतं. त्यांना स्वत:बद्दलचा जो द्वेष, न्यूनगंड आहे तो दूर व्हावा हे त्या मागील उद्दिष्ट होतं. नंतर अनेक वेळा समलैंगिकतेबद्दल बोलण्याचे योग आले. भाषणं, चर्चा इ. हे करताना वारंवार दिसत होतं की या विषयाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, समलिंगी लोकांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत. सगळ्या महाराष्ट्रात मी स्वत: जाऊन हा विषय मांडणं अनेक कारणास्तव अशक्य आहे. म्हणून ठरवलं की, समलैंगिकतेच्या विविध पैलूंवर एखादं पुस्तक लिहावं. या पुस्तकातून या विषयाची अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचेल; समलिंगी समाजाबद्दल, समलिंगी जीवनशैलीबद्दल संवेदनशीलता निर्माण होईल. हे पुस्तक कोणीही वाचावं असं लिहिलं आहे. वयात आलेल्या मुलां/मुलींनी, पालकांनी, समलिंगी व्यक्तींनी हे पुस्तक जरूर वाचावं. त्याच बरोबर वकील, डॉक्टर, पत्रकार, पोलिस, काउन्सेलर्स यांनाही या पुस्तकातली माहिती उपयोगी पडू शकेल. इंद्रधनु ... १०