पान:इंद्रधनु- समलैंगिकतेचे विविध रंग(Marathi).pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घरच्यांना समलिंगी नातं मंजूर नसेल तर घरात खूप भांडणं होऊ शकतात. घरच्यांनी नाइलाजाने हे नातं स्वीकारलं तरी मनात राग सलत राहतो व तो कुठल्या रूपाने व्यक्त होईल हे सांगता येत नाही. जर ती समलिंगी व्यक्ती आजारी पडली तर तिच्या घरचे त्याच्या जोडीदाराला त्याला भेटण्याची परवानगी देणार का ? का, दोघांची ताटातूट करणार? जर ती आजारी व्यक्ती दगावली तर शेवटचे विधी त्याच्या जोडीदाराला करायला देणार का ? का, जोडीदाराला दूर सारून त्यावर सूड उगवणार? दोन पुरुषांनी ( किंवा दोन स्त्रियांनी) आपलं घर सोडून एकत्र राहणं हा मोठा निर्णय असतो. छोट्या गावात एकत्र राहणं खूप अवघड असतं. लोकांचा प्रखर विरोध असतो. अशा व्यक्तींना वेगळं करून डांबून ठेवणं, एकमेकांना भेटू न देणं, त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीने भिन्नलिंगी व्यक्तीशी लग्न करायला भाग पाडणं असे प्रकार होतात. अशा वेळी काहीजण घर सोडून पळून जातात किंवा या जगात हे नातं कोणीही मान्य करणार नाही हे जाणून आत्महत्या करतात. [63] समलिंगी जोडप्यांना मोठ्या शहरात त्यांची जीवनशैली जगायचा वाव असतो. ज्यांना शक्य आहे ते स्वतःची जागा घेऊन राहतात. बाकीचे भाड्याची जागा घेऊन राहतात. मी माझ्या कार्यशाळेत एक प्रश्न विचारतो, “तुम्हाला एक जागा भाड्याने द्यायची आहे. कोणीही गिन्हाईक मिळत नाही. दोन पुरुष तुमच्याकडे आले आणि म्हणाले की, तुमचं डिपॉझिट आणि भाडं द्यायची आमची तयारी आहे. आम्ही एक समलिंगी जोडपं आहोत. तर तुम्ही या जोडप्याला तुमचं घर भाड्याने देणार का?" जवळपास सगळेजण ‘नाही' म्हणतात. कुणीही त्यांच्याबद्दल इतर माहिती विचारत नाही. कोणाकडून आलात? कुठे नोकरी करताय? काहीही नाही. ते एक समलिंगी जोडपं आहे एवढंच कारण त्यांना जागा न देण्यास पुरेसं होतं. कारण विचारलं तर 'शेजारचे आम्हाला नावं ठेवतील' असं सांगतात. म्हणून काही समलिंगी जोडपी रूममेट्स आहोत असं सांगून भाड्याच्या घरात राहतात. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपलं घरटं बनवण्याचा प्रयत्न करतात. लोकमत मधली एक बातमी [64] - सर्व बंधने झुगारत 'त्या' विवाहबंधनात अडकल्या! कोरपुट (ओरिसा), दि. ६ : युरोप आणि अमेरिकेतील समलिंगी विवाहाचं लोण ओरिसातील कोरपुटसारख्या जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी गावातही आता पोहोचलं आहे. आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचा कोणताही गंध नसलेल्या घुमूर या खेड्यातील दोन मुलींनी समाजाची सर्व बंधनं झुगारत केलेला विवाह सध्या या भागात चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय बनला आहे. O इंद्रधनु... १०१