पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पिंकी प्रामाणिक पश्चिम बंगालमधल्या एका लहान गावात जन्माला आली. घरची परिस्थिती बेताची. पाच बहिणी व एक भाऊ. पिंकी लहानपणापासून मुलांसारखी दांडगट होती. सर्व लक्ष खेळण्यात असायचं. ती मुलांबरोबरच खेळायची. तिला धावायला आवडायचं. तिनं धावण्याच्या शर्यतीत भाग घेणं आईवडिलांना पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांची नजर चुकवून सराव करावा लागे. पहाटे घरचे झोपले असताना ती सराव करायला बाहेर पडत असे. तिच्याबरोबर अजून एक मुलगा होता जो सराव करायचा. तो तिच्या दारावरून जाताना खोकायचा आणि खोकण्याचा आवाज आला, की ती सरावासाठी घराबाहेर पडायची.
 पिंकीनी धावण्याचा ध्यास घेतला, खूप मेहनत घेतली. कालांतराने ती कोलकाताला आली. नवीन शहरात रुळायला तिला थोडा वेळ लागला. हळूहळू तिची इतर खेळाडूंशी ओळख झाली. गावात ती मुलांसारखी वागणारी म्हणून उठून दिसायची. इथे तसं नव्हतं. ती सहज इतरांच्यात मिसळली. तिच्यासारखीच इतर मुली-मुलं पूर्ण जीव ओतून आपल्या खेळात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करत होती. इथे तिला सहज समजून घेतलं गेलं.
 हळूहळू तिच्या मेहनतीचं यश दिसू लागलं. ४०० मीटर व ८०० मीटरच्या दौडीत तिनं नाव कमावलं. तिला २००५च्या 'एशियन इनडोअर गेम्स'मध्ये सुवर्ण पदक, २००६च्या 'कॉमनवेल्थ गेम्स'मध्ये चांदीचं पदक, व २००६च्या 'एशियन गेम्स'मध्ये सुवर्ण पदक मिळालं. पुढे खेळताना इजा झाल्यामुळे व नंतर एका अपघातामुळे तिचा खेळातला प्रवास खुंटला. तिने नोकरी शोधली व रेल्वे तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी करू लागली.

 जून २०१२मध्ये पिंकीचं संपूर्ण आयुष्य बदललं. तिच्या रूम-मेट (मैत्रिण)ने तिच्यावर बलात्काराचा आरोप लावला व पोलीसात एफ.आय.आर. नोंदवला. पिंकीला अटक झाली. पिंकी स्वत:ला स्त्री मानत असूनही, सर्वजण तिला स्त्री म्हणून ओळखत असूनही, ती पुरुष आहे असं

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९८