पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खेळता आलं नाही तरी इतर अनेक जण आहेत, ज्यांना आपण प्रशिक्षण देऊन पुढे आणू शकतो; अशाने आपल्याला समाधान व आनंद मिळेल असा विचार करून ती परत उमेद धरू लागली.
 तामीळनाडूचे मुख्यमंत्री एन. करुणानिधी यांनी रुपये ५०००/- महिना मानधनावर तिची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली. जिल्ह्यातील नव्या खेळाडूंना ती प्रशिक्षण देऊ लागली. कालांतराने तिने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया' (SAI)च्या बेंगलोर सेंटरमध्ये 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स' (NIS)चा प्रशिक्षकाचा डिप्लोमा करण्यासाठी अर्ज केला. तिला तिची खेळाशी जोडलेली नाळ तोडायची नाही. तेच तिचं विश्व आहे; पण मार्ग मात्र आता बदलला आहे.
 शांतीचं वैयक्तिक, कौटुंबिक आयुष्य कसं असणार आहे? याबाबत तिची आई म्हणाली, "तिने लग्न करायचं का नाही हा तिचा निर्णय असेल." शांती म्हणाली, की तिला माहीत नाही, की तिच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलं आहे.


५. पिंकी (पश्चिम बंगाल) [1]


 २०१४ मध्ये मुंबईत एका कॉन्फरन्सला, जेंडर व स्पोर्ट्स अॅक्टिव्हिस्ट पयोनी मित्रा आल्या होत्या. त्यांना भेटायला मी मुंबईला गेलो. त्या मला भेटल्या व त्यांनी माझी पिंकी प्रामाणिकशी ओळख करून दिली. त्यावेळी पिंकीवर बलात्काराची केस चालू होती. तिच्यावर खूप मानसिक दडपण होतं. पिंकी मला पुस्तकासाठी मुलाखत द्यायला तयार नव्हती. म्हणून तिची माहिती मी वर्तमानपत्रातील लेखांच्या आधारे मांडली आहे.

- बिंदुमाधव खिरे


इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९७