पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गृहीत धरून तिला पुरुषाप्रमाणे वागणूक दिली गेली. पुरुष पोलीसांनी तिला नेलं व पुरुषांच्या कोठडीत टाकलं. २८ वर्षांच्या पिंकीवर ३७६ (बलात्कार), ४१७ (स्त्री नसूनसुद्धा स्त्री आहे असं भासवणं), ४९३ (आपल्या दोघांचं लग्न झालं आहे असं भासवून एका पुरुषाने एका स्त्रीबरोबर लैंगिक नातं प्रस्थापित करणं) व इतर कलमं लावण्यात आली. तिला अटक झाल्यावर तिला नोकरीवरून निलंबित करण्यात आलं.
 पिंकीच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. एका तपासणीच्या वेळी कोणीतरी मोबाइलवर तिच्या तपासणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं व ती 'एमएमएस क्लिप' इंटरनेटवर टाकली. मीडिया व पत्रकारांना एक सनसनाटी विषय मिळाला.
 लोक म्हणू लागले, की पिंकीने स्त्री आहे असं भासवून सर्वांची फसवणूक केली. तिला स्वत:चं खासगी आयुष्य उरलं नाही. पयोष्नी म्हणाल्या, "तिच्या अंगावर किती केस आहेत? ते तिच्या कोणकोणत्या वैद्यकीय चाचण्या झाल्या? या अशा गोष्टी चॅनेलवाले उघडपणे बोलत होते."
 तुरुंगात तिला चांगली वागणूक मिळाली. तिथले एक चाचा तिला मदत करायचे. मदतीचा हात असूनसुद्धा या सर्व मानहानीमुळे तिला खूप नैराश्य आलं. आपल्या वैद्यकीय तपासणीची चित्रफीत सर्व जगासमोर आली, हे कळल्यावर तिच्या मनात आत्महत्येचा विचार आला. बुटाच्या नाड्या वापरून गळफास तयार करावा व गळफास घेऊन मरावं असं तिला वाटू लागलं. तिने चाचांना विचारलं, की फास लावून घेतल्यावर मरायला किती काळ लागतो? त्यांनी ते वॉर्डनला सांगितलं. तेव्हापासून ती आत्महत्या करू नये म्हणून तिच्यावर दिवस-रात्र पाळत ठेवण्यात आली. २६ दिवसांनंतर तिला जामीन मिळाला.

 वैद्यकीय चाचण्यांत दिसून आलं, की पिंकी ही इंटरसेक्स व्यक्ती

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९९