पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शरीराच्या पेशी करून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तिची जननेंद्रियं पुरुषाची म्हणून विकसित झाली नाहीत. बाह्य जननेंद्रिय स्त्रीची बनली. मासिक पाळी आली नाही. छाती सपाट राहिली.) शांतीचा लिंगभाव स्त्रीचा होता व ती सर्वांना हेच सांगत होती, 'मी स्त्री आहे', पण तिच्या लिंगभावाला खेळाच्या कायद्यात काही किंमत नव्हती.
 परिस्थिती बिकट होत गेली. आशियाई स्पर्धेच्या अगोदर तिने भारतीय रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला होता; पण या घडामोडीनंतर तिला कुठे नोकरी मिळेना. समाजातील इज्जत गेली. शांतीने सर्वांची फसवणूक केली असे तिच्यावर लोक आरोप करू लागले. तिच्याकडे लोक वेगळ्या नजरेने बघू लागले- 'हा पुरुष आहे का कोण आहे?' तिची आई म्हणाली, "घरच्या एकावर संकट कोसळलं की त्याचा इतरांवर परिणाम होतो. तिच्या बहिणीची आता लग्न होणार का?"
 शांतीला खूप नैराश्य आलं. पोटापाण्यासाठी ती विटेच्या भट्टीत काम करू लागली. तिला आधार द्यायला कोणी नव्हतं. ती म्हणते, “मला 'तामीळनाडू अॅथलेटिक असोसिएशन', 'इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन', 'अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया' यापैकी कोणीही मदत केली नाही. कास्टर सेमेन्याच्या पाठीशी तिचा देश उभा राहिला. माझ्या बाजूने मात्र कोणीच उभं राहिलं नाही. मी जर दलित नसते किंवा श्रीमंत असते तर माझी ही अवस्था झाली नसती."
 आपलं सर्व कर्तृत्व मातीला मिळाल्यामुळे तिची जगण्याची उमेदच संपली. २००७ मध्ये नैराश्याच्या भरात तिने विष पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला, पण ती बचावली.

 कालांतराने शांतीने स्वत:ला सावरलं. आपल्याशिवाय आपल्या वयस्कर आईवडिलांकडे बघायला कोणी नाही; बहिणींची लग्नं बाकी आहेत; म्हणून आपण असं हार मानून चालणार नाही; आपल्याला जरी

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९६