पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुरुषांना व तृतीयपंथीयांना निरोध (कंडोम) वाटायचं काम करू लागले. दारोदार पैसे मागायचे आणि संस्थेतही काम करायचे. काही वर्षांनी, साठवलेल्या पैशांतून मी एका वस्तीत झोपडी घेतली.
 या प्रवासात एक-दोन जोडीदार मिळाले. वाटायचं, की आपल्या जोडीदारानी आयुष्यभर आपल्या बरोबर राहावं. पण कोणताच जोडीदार टिकला नाही. प्रत्येक जोडीदार फक्त पैसा आणि दारू मिळावी म्हणूनच जवळ यायचा. जेव्हा जोडीदार सेक्स करायचा तेव्हा काही वेळा थोडासा,पांढरा, चिकट स्राव लघवीच्या जागेतून बाहेर यायचा.
 काही वर्षांपूर्वी दोन भाऊ वारले. मग आई वारली. तिला कॅन्सर झाला होता. मग वडील गेले. त्यांची लिव्हर पार वाया गेली होती. दोन बहिणी आहेत. बहिणींच्या अडीअडचणीत मी खूप मदत करते. मागच्या वर्षी बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मी खूप खर्च केला. पण मनात विचार येतो, की आपल्याला गरज पडली तर कोणी काही मदत करेल का? नाही. माझ्या मदतीला कोणी नातेवाईक येणार नाहीत हे मला माहीत आहे. पण तरीसुद्धा त्यांनी उपाशीपोटी राहावं हे मला बघवत नाही म्हणून मी त्यांना मदत करते.
 मला साखरेचा त्रास (मधुमेह) सुरू झाला आहे. त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं.
 आता दारोदार पैसे मागायचा कंटाळा आला आहे. दारोदारी मागणं नको वाटतं. वाटतं की दूर कुठल्यातरी छोट्याशा गावी जावं व तिथेच राहावं.

४. शांती (तामीळनाडू) [1]


 शांतीला भेटायचा किंवा तिच्याशी बोलायचा योग आला नाही. ती तामीळनाडूमध्ये एक छोट्याशा गावात राहत असल्यामुळे तिला तिथे जाऊन

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९४