पान:इंटरसेक्स - एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारखान्यात कामाला लागलो.
 काही दिवसांनी मला एक जोगती भेटली. तिने मला कोणतीही माहिती न देता मला मोती बांधले (म्हणजे मला जोगता बनवलं). मग मी ताटली हातात घेऊन, पंजाबी ड्रेस घालून दारोदार पैसे मागू लागलो. पण हे करताना माझी ‘उजळणी' झाली नव्हती म्हणून काही जोगत्यांनी मला मारलं. ('उजळणी' म्हणजे सर्व जोगत्यांना बोलवून, उजळणीचे पैसे भरून गुरू चेल्याला 'माळ परडी' देतो. ती माळ परडी घेऊन, जोगत्याला ५ मोठ्या जोगत्यांच्या जमातीत जोगवा (पैसे) मागावा लागतो. यानंतर त्या नवीन जोगत्याला पूजेसाठी देव दिले जातात व मग तो देवाच्या नावानी जोगवा मागू शकतो.) म्हणून काही दिवस मी पैसे मागणं बंद केलं.
 कालांतराने पैशाची खूप गरज होती, म्हणून मी माहितीच्या तृतीयपंथीयांच्या ओळखीने, हिजडा घराण्यात ‘रीत' घेतली. (हिजडा घराण्यात 'रीत' घेणं म्हणजे एका हिजडा गुरूचा चेला बनणं.) परत मी 'मंगती' करू लागलो (दारोदार पैसे मागू लागलो). माझ्या लक्षात आलं, की विडी वळायच्या कारखान्यात मला दिवसभर काम करून जेवढे पैसे मिळायचे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मला अर्ध्या दिवसात, दारोदार पैसे मागून मिळतात. मग मी विडी वळायच्या कारखान्यात जाणं बंद केलं.
 मला बायकांसारखं रहावं असं वाटायचं म्हणून हळूहळू मी माझी साडी घालायची आवड पुरी करू लागले. नटू लागले. कानात डूल घालू लागले. लिपस्टिक लावू लागले. सर्व ओळखीचे मला मुलीच्या नावानी हाक मारू लागले. या काळातही काही तृतीयपंथीयांनी मला त्रास दिला. 'मला दाखव' म्हणून बळे बळे मला साडी वर करायला लावायचे व 'अगोऽ बाई हा तर बाळ जोगता' असं म्हणून तोंडात बोट घालायचे.

 काही वर्षांनंतर माझी मिलिंदशी गाठ पडली. तो समपथिक ट्रस्टमध्ये कामाला होता. त्याच्या ओळखीने मी समपथिक ट्रस्टमध्ये कामाला लागले.

इंटरसेक्स : एक प्राथमिक ओळख ९३